काही माणसं आपल्यापासून दूर गेली तरी मनात कायमचं घर करून राहतात. पंचवीस वर्ष आमच्याकडे धुणी-भांडी करणारी बेबी हीदेखील अशीच. तिने नेहमीच आमच्या घराला आपलं घर मानलं. सुख-दु:खात आपलेपणानेच मदत केली. मात्र काही कारणामुळे ही बेबी काम सोडून गेली मात्र तरीदेखील आमच्या मनात कायमचं घर करून राहिली.
बेबी – पंचवीस वर्षापूर्वी माझ्या घरी धुणी-भांडी करायला आलेली एक आगरी स्त्री! व्यवस्थित नेसलेली, स्वच्छ नऊवारी साडी, नीट घातलेला अंबाडा व त्यावर माळलेली फुलं. पाहताक्षणी तिला मी कामावर ठेवलं.
समवयस्क असल्यामुळे तिचा व माझा संवाद व्हायचा. त्याच्यातून अतिशय गरिबीतून ती संसार करताना जाणवायचं. लग्न झाल्यावर एकाच चटईवर बरेच दिवस काढल्याचं ती सांगायची. तिचं स्वच्छ व न सांगता जास्तीच मनापासून केलेलं काम पाहून मला ती जास्त आवडू लागली. हळूहळू मी तिला माझ्या परिने चादरी, मुलांचे कपडे देऊन मदत करत असे.
आजारपणामुळे व आगाऊ पैसे मागण्याच्या तिच्या सवयीमुळे तिची बरीचशी कामं सुटली. परंतु तिच्या आगाऊ पैसे मागण्याच्या सवयीचा मला कधीच राग आला नाही. कारण मी राहत असलेलं घर, फर्निचर हे मी माझ्या बँकेकडून घेतलेले आगाऊ पैसेच होते की! गरिबीमुळे होणारी आजारपण हे मी माझ्या कोकणातल्या वास्तव्यात बघितलंच होतं. त्यामुळे तिच्या आजारपणातल्या दांडय़ा याही गोष्टींचा मला राग आलेला नाही. या तिच्या वागण्याकडे मी दुर्लक्ष केल्यामुळे तिला मी व माझी माणसं जवळची वाटू लागली. नंतर तर ती कामावर येणार नसेल तर मला आगाऊ सांगायची, ‘वहिनी, तुम्ही एक चमचापण घासू नका. भांडी तशीच ठेवा कितीही भांडी असली तरी तिच्या चेह-यावर नाराजी दिसत नाही. तिच्या या गुणाची मी, माझे नातेवाईक, मैत्रिणी यांना गप्पांमध्ये सांगत असे.
त्यांच्याही बेबी चांगल्या परिचयाची झाली होती. माझं घर हे ‘आपलं घर’ असाच तिच्या बोलण्यातून उल्लेख असायचा! माझ्या सासूबाईंच्या आजारपणात तर ‘वहिनी तुम्ही कामावर जा मी आजींकडे पाहते’ या तिच्या विश्वासपूर्ण बोलण्याने मी बँकेतही बिनधास्तपणे काम करू शकले. म्हणूनच माझ्या ऑफिसातल्या निरोप समारंभात तिचा उल्लेख आलाच!
माझ्या मुलाच्या लग्नात तर पाहुण्यांना घर टापटीप दिसावं म्हणून हिचा कोण आटापिटा! हॉलमधून दोन तास आधी निघून पाहुणे येण्याच्या आधी लग्न घर असूनही घर टापटीप! सर्वाना त्याचं आश्चर्य वाटलं. म्हणूनच माझ्या मुलाच्या लग्नात सर्वात मोठं मानपान झालं बेबीचं.. एक नवा कोरा फ्रिज देऊन!
आता आता वयाप्रमाणे माझं एकच काम होतं. डोंबिवलीतल्या एका गावातून येताना बस, रिक्षाचा खर्चच मुळी ४०-५० रुपये होत होता. पण मला हे काम नोकरी करून कसं जमणार म्हणून ती येत होती. माझ्या सेवानिवृतीनंतर ती काही दिवस येत राहिली. आणि तिच्या जीवनात एक आनंदाची गोष्ट घडली. तिच्या वडिलोपार्जति पडीक जमिनी बिल्डरने घेतल्या व त्याचे तिला जवळजवळ ६५ लाख मिळाले. इतके पैसे मिळाल्यामुळे मीच तिला आता कामावर येऊ नकोस. उरलेलं आयुष्य आनंदात घालवं म्हणून सांगितलं. अतिशय दु:खी अंतकरणाने तिने २५ वर्षाचं माझं काम सोडलं. ती गेल्यावर मला कुठल्याच बाईला कामावर ठेवावंसं वाटलं नाही. कारण आता परत तशी बेबी मिळणं अशक्य!
माझ्या बँकेतल्या नोकरीमुळे व माझ्या मिस्टरांच्या वरील विश्वासाने तिचे बँक अकाउंट उघडणे, पोस्टडेटेड चेक भरणे, तिने नवीन घर बांधायला घेतल्यामुळे पैसे काढायला मदत करणे हे काम माझे मिस्टर व मुलगा करत असे.
मध्यंतरी माझ्या सोसायटीतला ब्लॉक आम्ही माझ्या मुलासाठी घेतला. त्याच्या बँकेच्या कर्जाला विलंब होत असल्याचं बेबीने आमच्या संवादातून ऐकलं. तिने त्या दिवशी आपल्या नव-याला सांगितलं. दुस-या दिवशी कामावर आल्या आल्या ती आम्हाला म्हणाली, ‘वहिनी, दादा आमचे बँकेतले पैसे तुम्ही घ्या. आमच्या घराला अजून वेळ आहे. चांगला ब्लॉक हातचा घालवू नका.’ कुठे १०-२० रुपयांसाठी व्यवहार करणारी श्रीमंत माणसं! आणि कुठे लाखो रुपये तुमच्या कामासाठी देऊ करणारी अडाणी माणसं!
म्हणूनच बेबी ही आमच्या इतकी जवळची होती की कुठल्याही प्रवासातून आलो कीपहिली भेट बेबीचीच! मग ती कोकणातून आणलेली काजू-आमसुलं असोत की युरोपमधून आणलेली हँड बॅग असो!
आता गरज नसतानाही या दिवाळीत बेबीने पांच दिवस येऊन घरातल्या भिंती पुसण्यापासून घर लख्ख ठेवलं तेव्हा कुठे तिचं समाधान झालं. म्हणूनच माझा मुलगा तिच्या बेबी या नावावरून म्हणतो, आमच्या आईच्या हाताशी साक्षात बिग-बी आहे. अश्या आमच्या बेबीने आमच्याबरोबर आमच्या घरावर फार प्रेम केलं. आणि आता तिच्याकडून माझ्या घरावर मी कसं प्रेम करायचं हे शिकत आहे.
” bebi ” सारखी माणस मिळणे सध्याच्या जगात अशक्य आहेच , संगीता सावंत ताई,आपला लेख आवडला ,!