सचिनच्या क्रिकेट कारकीर्दीत त्याच्याबरोबर खेळलेल्या, त्याचा खेळ जवळून बिघतलेल्या माजी क्रिकेटपटूंनी सचिनच्या निवृत्तीवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया
दिलीप वेंगसरकर
(निवड समितीचे माजी सिलेक्टर)
सचिन हा महान क्रिकेटपटू आणि जगातील सर्व क्रिकेटपटूंसाठी आदर्श आहे. माणूस म्हणूनही तो खूप मोठा आहे. सचिनने क्रिकेटच्या सर्व प्रकारांत विक्रमांची नोंद केली आहे. सचिन इतक्या लगेच निवृत्ती घेईल हे मला अपेक्षित नव्हते. आणखी एक वर्ष तरी खेळेल असे मला वाटत होते.
सुनील गावस्कर
(भारताचे माजी कसोटीपटू)
भारताच्या फलंदाजीच्या फळीत मोठी पोकळी निर्माण होणार आहे. लक्ष्मण, गांगुली आणि द्रविडच्या निवृत्तीनंतर भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये कसे निकाल लागले ते आपण पाहिलेच आहेत. आता त्यात सचिनच्या निवृत्तीची भर पडली आहे. सचिनची कसोटीतील चौथ्या क्रमांकाची जागा घेणे कठीण आहे. कारण चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणा-याला मोठी जबाबदारी घ्यावी लागते. सचिनने तंत्र आणि आक्रमकता याचा साधलेला सुरेख मिलाफ ही त्याच्यातील गुणवत्ता दाखवते. एकही असा फटका नाही जो सचिन खेळला नाही.
शरद पवार (आयसीसीचे माजी अध्यक्ष)
सचिनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने क्रिकेट जगताचा सुवर्णकाळ (गोल्डन इरा) संपला. त्याच्या मोठय़ा कारकीर्दीत त्याने अनेक विक्रम रचले आहेत. सचिन हा नेहमीच येणा-या अनेक पिढयांसाठी आदर्श असेल. सचिनचे फक्त भारतीयांनीच नाही तर जगानेही कौतुक केले आहे. माणूस म्हणूनही सचिन फार मोठा आहे. सध्याच्या क्रिकेटमधील डॉन ब्रॅडमन असे मी त्याचे वर्णन करेन. तो क्रिकेटसाठी यापुढेही योगदान देईल याची मला खात्री आहे.
सौरव गांगुली (भारताचा माजी कर्णधार) : सचिनने निवृत्तीचा निर्णय योग्य वेळी घेतला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी त्याने हा निर्णय घेतला हे चांगले झाले. सचिनच्या शेवटच्या दोन कसोटी कुठेही होऊ देत चाहत्यांनी मोठया संख्येने त्या पाहण्यासाठी यावे अशी मी विनंती करतो.
एन. श्रीनिवासन (बीसीसीआयचे अध्यक्ष) : ‘‘सचिन लहान असताना जेव्हा चेन्नईत बुची बाबू क्रिकेट खेळायला आला होता तेव्हापासूनच सचिनचा मी मोठा चाहता आहे. भारताचा तो सर्वात महान क्रिकेटपटू आहे असे म्हणेन. जगातील सर्वकालीन महान क्रीडापटूंमध्ये सचिन अव्वल स्थानी आहे असे मी म्हणेन. सचिनइतकी भारतीय क्रिकेटची सेवा कोणीही केलेली नाही. फक्त क्रिकेटपटूच नाही तर भारतातील सर्व क्रीडापटूंचा सचिन आदर्श आहे. सचिनशिवाय भारतीय संघाची कल्पना करणे कठीण असेल तर आता त्याच्या निर्णयाचा आदर करायला हवा.
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंकेचा माजी ऑफस्पिनर) : क्रिकेट जगतासाठी हा वाईट दिवस आहे. सचिनला यापुढे आपण क्रिकेट खेळताना पाहू शकणार नाही. एक गोलंदाज म्हणून मला सचिनची विकेट घ्यावी हे नेहमीच वाटायचे. मात्र मला त्याने फारशी संधी दिली नाही. त्याची महानता शब्दात वर्णन करणे कठीण आहे.
चंदू बोर्डे (भारताचे माजी कसोटी कर्णधार) : भारताने १९८९मध्ये पाकिस्तानच्या केलेल्या दौ-यात मी त्याला पाहिले होते. खेळाला इतका गंभीरपणे घेणारा क्रिकेटपटू मी पाहिलेला नाही. जोपर्यंत ग्राउंड्समन सांगत नाही तोपर्यंत सराव थांबवायचा नाही हा पायंडा त्याने सुरुवातीपासून सांभाळला.
कृष्णाम्माचारी श्रीकांत (निवड समितीचे माजी सिलेक्टर) : सचिनला सलाम. सचिनने कसोटी पदार्पण केलेल्या संघाचा मी कर्णधार होतो हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते. १६व्या वर्षी त्याने ज्याप्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील दडपण हाताळले ते विलक्षण होते. आता इतके यश मिळवूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत.
किरण मोरे (निवड समितीचे माजी सिलेक्टर) : सचिन आता ख-या अर्थाने टीव्हीवरून खेळताना दिसणार नाही हे मान्य करणे कठीण आहे. सचिनला निवृत्तीचा निर्णय घेणे सोपे नसले तरी त्याच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. भारतात क्रिकेट सर्वात प्रसिद्ध आहे कारण सचिन आहे.
अजित वाडेकर (भारताचे माजी कसोटी कर्णधार) : सचिन आणखी एक वर्ष खेळेल असे मला वाटत होते. सचिन हा जगातील सर्वात महान क्रिकेटपटू आहे. सचिनच्या असंख्य विक्रमांना कोणी मागे टाकेल असे वाटत नाही. सचिन कधीही कोणत्याही वादात पडला नाही हेदेखील त्याच्या महानतेचे लक्षण आहे.
मोहम्मद अझरुद्दिन (भारताचा माजी कर्णधार) : सचिनच्या निवृत्तीचा निर्णय ऐकून धक्का बसला नाही. कारण कधीतरी हा निर्णय ऐकू येणार हे निश्चित होते. सचिनच्या कारकीर्दीचा अभिमान वाटतो.
संजय मांजरेकर (भारताचा माजी क्रिकेटपटू) : कोवळा सचिन ते महान क्रिकेटपटू हा त्याचा जवळून पाहिलेला प्रवास विलक्षण आहे. सचिनला शुभेच्छा.
पार्थिव पटेल (भारताचा यष्टिरक्षक) : सचिनची महानता सांगण्यासाठी शब्द अपेरे आहेत. सचिनपाजी तुमची उणीव नेहमीच भासेल.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया : सर्वाधिक धावांचा मालक सचिन कारकीर्दीत २००वी कसोटी खेळून निवृत्त होणार आहे.
अजिंक्य रहाणे (भारताचा क्रिकेटपटू) : सचिनसोबत फलंदाजी करण्यासोबत ड्रेसिंगरुम शेअर करता आली यासाठी स्वत:ला नशीबवान समजतो.
सायना नेहवाल (भारताची बॅडमिंटनपटू) : सचिनची २०० वी कसोटी जिथे असेल तिथे प्रेक्षक म्हणून उपस्थित राहणार.
SACHIN HA MAHAN KHELADU AAHE SACHIN CHI BAROBARI KONTACH KHELADU KARUSHAKAT NAHI..