एखाद्या गोष्टीची आवड, कष्ट करण्याची जिद्द असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो हे सिद्ध केलेय ते आचरा डोंगरेवाडी येथील रवींद्र बागवे यांनी.
एखाद्या गोष्टीची आवड, कष्ट करण्याची जिद्द असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो हे सिद्ध केलेय ते आचरा डोंगरेवाडी येथील रवींद्र बागवे यांनी. उच्चशिक्षित असूनही त्यांनी नोकरीच्या मागे न लागता बांधकाम आणि शेती क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. सेंद्रिय शेतीची कास धरत त्यांनी क्षारपड जमिनीत कलिंगड लागवडीचा प्रयत्न करत तो यशस्वी केला. लालबुंद गोड चवीची कलिंगडे म्हणून त्यांच्या मालाला सध्या बाजारातून मागणी वाढत आहे.
एम.ए.पर्यंत शिक्षण घेऊनही रवी बागवे कधीही नोकरीच्या मागे लागले नाहीत. सुरुवातीला आचरा बाजारपेठेत सदाशिव क्लॉथ स्टोअर्स म्हणून कपडय़ाचे दुकान सुरू केले. यासोबतच त्यांनी आपली आवड असलेल्या बांधकाम व्यवसायालाही सुरुवात केली. पण शेतीची आवड असलेल्या बागवे यांचे मन तेथे रमत नव्हते. त्यांनी डोंगरेवाडी येथे आपल्या घराच्या मागे असलेल्या खाजण जमिनीतच काहीतरी करण्याचा विचार सुरू केला. खाऱ्या पाण्यामुळे क्षारपड नि रान गवताने निकृष्ट बनलेल्या जमिनीतच कलिंगड लागवड करण्याचा विचार केला. यासाठी त्यांनी स्वत: मेहनत घेऊन तेथील गवत काढून जागा साफ केली. काढलेले गवत फेकू न न देता शेतातच खड्डा खणून त्यापासून कंपोस्ट खत बनवण्यासाठी कुजत ठेवले. कलिंगड लागवडीसाठी अगस्टा या बियाण्यांचा वापर केला. साधारण एक एकर क्षेत्रासाठी दीड हजाराचे बियाणे आणले. खड्डे काढून जमिनीत रुजण्यासाठी न घालता त्यांनी बियाणा मोड काढून रोपे लावली. यामुळे त्या बियाण्यांची उगवणक्षमता वाढली. सगळे खड्डे गोवरणे भरून घेतले. रोपे लावताना केवळ प्रोटो मिलचा वापर केला गेला. बाकी संपूर्ण कालावधीत खतासाठी म्हणून गोवर, कुजलेले मासे आदींचाच त्यांनी वापर केला. तर फवारणीसाठी गुरांचे गोमूत्र आणि कडुनिंबाचा अर्क यापासून घरीच बनवलेले कीटकनाशक वापरले. याचा परिणाम म्हणून त्यांच्या शेतात केवळ (८५ दिवसांतच) कलिंगडे तयार झाली. संपूर्ण सेंद्रिय शेतीचीच कास धरल्याने त्यांना शेंडा रोग, बुरशी आदी कलिंगडावरील रोगांचा प्रादुर्भाव जाणवला नाही.
ऐन थंडीतही त्यांनी या शेतीची राखण केली. ज्या जमिनीत पूर्व रानटी गवतच उगवायचे तेथे कष्टाने सेंद्रिय शेतीचा कलिंगड लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. संपूर्ण सेंद्रिय खतांमुळे त्यांच्या शेतात तयार झालेल्या कलिंगडाची गोडी वाढली आहे. आतून लालबुंद आणि गोड चवीची कलिंगडे म्हणून त्यांच्या मालाला मागणी वाढत आहे. सध्या त्यांनी आचऱ्याच्या स्थानिक बाजारामध्येच त्यांची विक्री सुरू केली आहे. केवळ जिद्द आणि आवडीनेच निकृष्ट जमीन असलेल्या डोंगरेवाडीच्या खाजण भागात कलिंगडांची यशस्वी लागवड करून रवी बागवे यांनी आदर्श निर्माण केला आहे. यापुढील कालावधीत अजून मोठय़ा प्रमाणात ही लागवड करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.
khartancahi jamin lagvadi khali anun konkanatil shetakaryana disha denyache kam changle aahe