मुंबईतील मनोरंजन मैदाने आणि खेळाची मैदाने असलेल्या मोकळ्या जागा दत्तक तत्त्वावर देण्याच्या धोरणाला तात्पुरती स्थगिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर महापालिका आयुक्तांनी याचा आढावा घेण्यात सुरुवात केली आहे.
मुंबई- मुंबईतील मनोरंजन मैदाने आणि खेळाची मैदाने असलेल्या मोकळ्या जागा दत्तक तत्त्वावर देण्याच्या धोरणाला तात्पुरती स्थगिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर महापालिका आयुक्तांनी याचा आढावा घेण्यात सुरुवात केली आहे.
मात्र, जे २१६ भूखंड विविध संस्थांना देण्यात आले आहेत त्यांना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नोटीस जारी करण्याचे निर्देश उद्यान विभागाला दिले आहेत. त्यानुसार उद्यान विभाग कामाला लागले असून महापालिकेने दत्तक तसेच काळजीवाहू तत्त्वांनुसार दिलेल्या भूखंडांमध्ये शिवसेनेचे नेते आणि पदाधिका-यांच्या ताब्यात तब्बल पंधरा लाख ५७ हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे मोकळे भूखंड असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मनोरंजन मैदाने आणि खेळाच्या मैदानांचे दत्तक धोरण सभागृहात मंजूर झाल्यानंतर याविरोधात रान उठले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याला आढावा घेऊन याचा अहवाल तयार करेपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली. परंतु यापूर्वी दत्तक तत्त्वावर दिलेल्या एकूण २२५पैकी आठ ते नऊ भूखंड महापालिकेच्या ताब्यात आले असून उर्वरित २१५ ते २१६ भूखंड अद्याप संस्थांच्या ताब्यात आहेत.
या संस्थांमध्ये शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी यांची नावे अग्रणी आहेत. यामध्ये दत्तक तत्त्वावर सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांची मधुकर विश्वासराव शिक्षण संस्था, खासदार गजानन कीर्तिकर आणि सुनील प्रभू यांचे आरे भास्कर, माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे दहिसर स्पोर्ट्स क्लब, माजी स्थायी समिती अध्यक्ष असलेले अमरनाथ पाटील, माजी महापौर दत्ता दळवी यांचे श्री दत्त क्रीडा प्रबोधिनी यांसह उद्योगमंत्री शिवसेना नेते सुभाष देसाई यांची प्रबोधन आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचा मातोश्री आर्ट्स अँड स्पोर्ट्स क्लब आदी संस्थांना काळजीवाहू तत्त्वावर मोकळे भूखंड दिले असल्याचे दिसून येत आहे. या संस्थांकडे सुमारे १५ वर्षापासून हे मोकळे भूखंड असून तब्बल दीड लाख चौरस मीटरची जागा या संस्थांच्या ताब्यात असल्याची आकडेवारी प्राप्त झाली आहे.
दत्तक तत्त्वावर दिलेल्या मोकळ्या जागा
» मधुकर विश्वासराव शिक्षण संस्था, लॉईड टॉवर : ३३ हजार ८४० चौरस फूट क्षेत्रफळ
» आरे भास्कर, चिंचोली गोकुळ धाम : २ लाख ५० हजार चौरस फूट क्षेत्रफळ
» दहिसर स्पोर्ट्स क्लब, कांदरपाडा बेस्ट आगार जवळ (मनोरंजन मैदान) : ३७ हजार ७०० चौरस फूट
» दहिसर स्पोर्ट्स क्लब, झेन गार्डन, कांदरपाडा (मनोरंजन मैदान) : ४२ हजार ५५० चौरस फूट
» दहिसर स्पोर्ट्स क्लब, रामकुमार ठाकूर रोड (खेळाचे मैदान) : २ लाख ३० हजार चौरस फूट
» अमरनाथ पाटील ट्रस्ट, गोवंडी स्थानक रोड (मनोरंजन मैदान) : ९४ हजार चौरस फूट
» श्री दत्त क्रीडा प्रबोधिनी, भांडुप लिंक रोड (खेळाचे मैदान) : १ लाख ८० हजार चौरस फूट
काळजीवाहू तत्त्वावर दिलेल्या मोकळ्या जागा
» मातोश्री आर्ट्स अँड स्पोर्ट्स क्लब, जोगेश्वरी मजास (मनोरंजन मैदान) : ५ लाख ६१ हजार चौरस फूट
» प्रबोधन, प्रबोधनकार मार्ग, सिद्धार्थ नगर, गोरेगाव (मनोरंजन मैदान) : १ लाख २८ हजार चौरस फूट
———
Time to face the music armed with this great inoafmotirn.