कठीण परिस्थितीवर सहज मात करत प्रेमा जयकुमार या रिक्षाचालकाच्या मुलीने देशात पहिला क्रमांक पटकावला.
मुंबई- जिद्द आणि परिश्रमाची तयारी असली तर यशस्वी होणे फार अवघड नसते. कठीण परिस्थितीवरही सहज मात करता येते, याचा प्रत्यय चार्टर्ड अकाउंटट (सीए) या कठीण मानल्या जाणा-या परीक्षेत देशातून पहिल्या आलेल्या प्रेमा जयकुमार या रिक्षाचालकाच्या मुलीने पुन्हा दिला आहे.
घरची परिस्थिती बेताची असूनही प्रेमाने ७५.८८ टक्के गुण मिळवून हा बहुमान मिळवला. मालाड पूर्वेला असलेल्या एस. बी. खान चाळीत एकाच खोलीच्या घरात ती राहते. सीए प्रवेश परीक्षेतही ती पहिलीच आली होती. नोव्हेंबर २०१२मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स इन इंडियाने घेतलेल्या या परीक्षेला देशभरातून ५१ हजार ९०६ विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा देशातील ३४३ परीक्षा केंद्रांवर झाली होती. या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक आंध्रच्या इंदन कुमार तर तिसरा क्रमांक तामिळनाडूमधील कोइमतूरच्या गणसपथ याने मिळविला आहे. कॉमन प्रोफिशिअन्सी टेस्टच्या (सीपीटी) परीक्षेला यंदा एक लाख ११ हजार ९६१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३० हजार ३०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
आपण चाळीत राहतोय याची खंत असली तरी त्याकडे मी कधीही लक्ष दिले नाही. मुंबई विद्यापीठातून बी. कॉम आणि पुढे एम. कॉमची पदवी पूर्ण करताना अनेक शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सीएच्या परीक्षेसाठी महागड्या क्लासेसला जाता आले नसले, तरी सीए व्हायचेच, हा ध्यास मी घेतला होता. अभ्यास आणि वेळेचे नियोजन केल्यामुळे यशाची खात्री होती. पण देशात टॉपर ठरेन असे वाटले नव्हते. या यशात आई-वडील आणि शिक्षकांचे सर्वात मोठे श्रेय आहे. – प्रेमा जयकुमार
Abhinandan prema, khup mothhi ho, sadhyachya jagat mullinni independant & strong banalech pahije
Hearty Congratulations