जानवली-सापळे बाग नजीक प्रज्ञा नायगांवकर यांच्या बंगल्यातून सुमारे तीन लाख चौदा हजारांची रोकड लंपास करून प्रियकारासमवेत पळून गेलेल्या मोलकरणीला कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी चोवीस तासांत गजाआड केले.
कणकवली– जानवली-सापळे बाग नजीक प्रज्ञा नायगांवकर यांच्या बंगल्यातून सुमारे तीन लाख चौदा हजारांची रोकड लंपास करून प्रियकारासमवेत पळून गेलेल्या मोलकरणीला कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी चोवीस तासांत गजाआड केले. बुधवारी सायंकाळी हरकुळ बु. येथील प्रियकराच्या घरातून दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळील दोन लाख सत्तावीस हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक लांगी यांच्या नेतृत्वाखाली चोरटय़ांना रंगेहात ताब्यात घेत केलेल्या कारवाईबाबत पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांनी या प्रकरणी मोलकरीण मनीषा निकम (२०, रा. हुमरट) व तिचा प्रियकर प्रताप सापळे (२४, रा. हरकुळ बु.) या दोघांना या चोरी प्रकरणी अटक केली आहे. जानवली सापळेबागनजीक प्रज्ञा प्रकाश नायगांवकर यांच्या बंगल्यात घरकाम करणारी मोलकरीण आपल्या कामानिमित्त बाहेरगावी गेली असल्याने तिने मनीषा संतोष निकम हिला बदली मोलकरीण म्हणून नायगांवकरांच्या बंगल्यात पाठवले होते. मंगळवारी सायंकाळी घरी आलेल्या प्रकाश नायगांवकर यांना आपल्या बंगल्यातील लॉकरमध्ये ठेवलेल्या तीन लाख चौदा हजारांची रोकड सापडली नाही. त्यांनी आपल्या घरात चौकशी केली असता नवीन मोलकरीण येऊन गेल्याचे समजताच त्यांनी पोलिसांना या चोरीच्या घटनेबाबत कळवले आणि मनीषा निकम हिच्यावर संशय व्यक्त के ला. पोलिसांनी चौकशी केली असता तिचा एक मित्र प्रताप सापळे हा हरकुळ बु. येथे राहात असल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने हरकुळ. बु. येथील त्याच्या घरी धाव घेतली.
पोलिसांची शोध मोहीम सुरू असताना प्रताप हरकुळ बु. येथे घरी संध्याकाळी येणार असल्याचे समजले. पोलिसांनी हरकुळ. बु. येथील गावात सापळा रचत बुधवारी सायंकाळी ४ वा. प्रताप घरी येताच प्रताप व मनीषा या दोघांना ताब्यात घेतले. प्रताप याला पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्यावर त्याने तोंड उघडले. त्याने ही चोरी मनीषाने केली असल्याची कबुली दिली.
घरात कुणी नसल्याने डाव साधला
मनीषाने मंगळवारी सकाळी ९.४५ ते ११ या वेळेत घरात कुणी नाही असे बघून लॉकर उघडले आणि आत रक्कम पाहून तिचे डोळेच दीपले. तिने लॉकरमध्ये असलेली तीन लाख चौदा हजारांची रोकड आपल्याकडे घेत पोबारा केला. ही रक्कम चोरल्याची कबुली पोलिसांना तिने दिली.
अग ! भवाने आता तू आणि तुझा प्रियकर दोघांनी मिळून बसा जेलच्या भाकऱ्या खात ,!