ऊठसूठ राणे कुटुंबीयांवर टीका करायची हा विनायक राऊत यांचा एकमेव धंदा आहे. शिवसेनेकडून खासदारकीच्या उमेदवारीची लॉटरी लागेल, या आशेने हा लाळ घोळत बसला आहे.
चिपळूण- ऊठसूठ राणे कुटुंबीयांवर टीका करायची हा विनायक राऊत यांचा एकमेव धंदा आहे. या वाकडय़ा तोंडवाल्याची पाच मते मिळवायची लायकी नाही. पण शिवसेनेकडून खासदारकीच्या उमेदवारीची लॉटरी लागेल, या आशेने हा लाळ घोळत बसला आहे. खासदार डॉ. निलेश राणे यांनी गेल्या ५ वर्षात आपल्या मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. मात्र, डोळ्यावर पट्टी बांधून राऊत हे सर्व नाकारत आहे. हा आधुनिक ‘धृतराष्ट्र’ आहे. परंतु येत्या लोकसभा निवडणुकीत आम्ही चोख उत्तर देऊ, अशी इशारा युवक कॉँग्रेसचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष इर्शाद वांगडे यांनी दिला आहे.
शिवसेनेचे आमदार विनायक राऊत हे चिपळुणातील पोफळी दौ-यावर आले असता त्यांनी खासदार डॉ. निलेश राणे यांच्यावर टीका केली. त्या टीकेचा येथील कॉँग्रेसचे युवा पदाधिकारी वांगडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्धारे खरपूस समाचार घेतला आहे. यानुसार त्यांनी नमूद केले आहे की, यापूर्वी कोकणात अनेक खासदार होऊन गेले पण खासदार निधीचा १०० टक्के विनियोग करणारे डॉ. राणे एकमेव आहेत. त्या कामांची ‘अज्ञानी’ राऊतांनी सर्वप्रथम माहिती घ्यावी. डॉ. राणे हे वडिलांच्या पुण्याईमुळे निवडून आले, असे राऊत सांगतात. पण यापूर्वीचे शिवसेनेचे येथील खासदारही उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यामुळेच निवडून आले होते, याचा विसर त्यांना झालेला दिसतोय. विकासकामे कशी करावीत, हे राऊतांनी सांगण्याचा प्रयत्न करू नये. कारण डॉ. राणे हे उच्चविद्याभूषित आहेत. त्यांना कोकणातील जनतेविषयी कळवळा, आपुलकी आहे. राऊत गावंढळपणे आणि अडाणीपणे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
यापूर्वीचे खासदार ५ वर्षातून क्वचितच भेट घेण्यासाठी येत असत, असा अनुभव आहे. पण डॉ. राणे यांनी आपल्या मतदारसंघाशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. त्यामुळे शिवसेनेतील मातब्बर मंडळी डॉ. राणे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास नकार देत आहेत. कारण त्यांना पुढच्या परिस्थितीची आधीच कल्पना आलेली दिसत आहे. पण राणे कुटुंबीयांविरोधात आपण ‘टिव टिव’ केली तर ठाकरे आपल्याला खासदारकीची उमेदवारी देतील, अशी दिवास्वप्ने राऊत रंगवत आहेत. डॉ. राणे यांच्या झंझावाती दौ-यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. त्यांनी राणे कुटुंबीयांना बदनाम करण्याचे थांबवावे, आपली पोपटपंची बंद करावी. राऊतांची शिवसेनेत काय पत आहे हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे डॉ. राणे यांच्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:ची इभ्रत सांभाळावी, असा उपरोधिक सल्ला वांगडे यांनी दिला आहे.
Swatachya mumbai yetil rahtya matadar sanghatahi aj pan sabha yashasvi karu na saklela Mr. raut.