‘तो’ आपल्याला आणि आपण ‘त्याला’ घाबरतो..असा हा ‘आजोबा’ कोकणात मोठय़ा प्रमाणात आढळतो. या ‘आजोबा’ची कथा आपण चित्रपटाद्वारे पाहिली.
चिपळूण – ‘तो’ आपल्याला आणि आपण ‘त्याला’ घाबरतो..असा हा ‘आजोबा’ कोकणात मोठय़ा प्रमाणात आढळतो. या ‘आजोबा’ची कथा आपण चित्रपटाद्वारे पाहिली. जगण्यासाठी संघर्ष करणारा बिबटय़ा आणि त्याच्या जीवनक्रमात आड येणारा मानव यांच्यातील संघर्ष अनेकवेळा स्पष्ट झाला. अशीच एक घटना चिपळूण तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथे घडली.
मानव आणि बिबटय़ातील संघर्ष शिगेला पोहोचला. अखेर या संघर्षात बिबटय़ाचा पराभव झाला आणि मानवाने त्याच्यावर मात केली. मात्र, यामध्ये साडेतीन वर्षाच्या मादीची झुंज अपयशी ठरली आणि पोसरे येथील अविनाश शांताराम शिर्के (३५) हे जबर जखमी झाले आणि बिबटय़ाच्या तावडीतून ते यशस्वीरित्या बाहेर आले.
हा थरारक प्रकार पोसरे बौद्धवाडी येथे रविवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला. पोसरे बौद्धवाडी येथे निर्जनस्थळी अविनाश शिर्के यांचे घर आहे. नेहमीप्रमाणे ते दूध घेऊन पोसरे मोहल्ला येथे जंगलवाटेने चालले होते. पोसरे बौद्धवाडीजवळ आले असता एका तारेच्या कंपाऊंडमध्ये त्यांच्यावर बिबटय़ाने हल्ला चढविला. क्षणभर ते घाबरले. मात्र, प्रसंगावधान राखून ते सावध झाले आणि कोणताही मागचा-पुढचा विचार न करता आपल्या हातातील दुधाच्या किटलीने त्याने बिबटय़ावर हल्ला चढविला.
एका बाजूने बिबटय़ा झडप घालत होता..तर दुस-या बाजूने त्याचा हल्ला चुकवत अविनाश किटलीचा प्रहार करीत होते. याचदरम्यान ते टोकेरी तारेच्या कुंपणाजवळ आले. बिबटय़ाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी तो हल्ला चुकविला आणि बिबटय़ा त्या तारेवर जावून आदळला. हा प्रकार दोन-तीनवेळा घडला.
त्यानंतर अविनाश यांना थोडा वेळ मिळाला. बिबटय़ाच्या पंजामध्ये तारा घुसल्याने तोही रक्तबंबाळ झाला. तर दुसरीकडे अविनाश यांच्या एका हातावर पंजा मारल्यामुळे तेही रक्तबंबाळ झाले. मात्र, त्यांनी शेवटपर्यंत धीर सोडला नाही. संधी मिळताच त्यांनी जवळचाच एक मोठा दगड उचलला आणि स्वसंरक्षणार्थ बिबटय़ाच्या डोक्यात घातला.
दगडाच्या जोरदार प्रहारामुळे रक्तबंबाळ झालेला बिबटय़ा भीतीने पळाला. त्यानंतर मात्र अविनाश शिर्के हे घाबरले. त्यांनी तोर जोरात ओरडत जवळच्या वाडीत त्यांनी धूम ठोकली. घडलेला प्रकार त्यांनी ग्रामस्थांना सांगितला आणि हा थरारक प्रसंग ऐकून सर्वचजण अवाक् झाले.
वाघाच्या जबडय़ातून सुखरूप आलेले अविनाश शिर्के यांनी तात्काळ कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या संपामुळे तेथे त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे शहरातील लाईफ केअर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, जखमी अवस्थेतील बिबटय़ा जंगलात पळाला. तारेच्या काटेरी कुंपणामुळे त्याच्या पंजामध्ये तारा घुसल्या आणि बिबटय़ा रक्तबंबाळ झाला. त्यात किटलीचा प्रहार आणि स्वसंरक्षणार्थ शिर्के यांनी त्याच्यावर घातलेला दगड यामुळे बिबटय़ा घायाळ झाला आणि जंगलात निर्जनस्थळी कोसळला. ही खबर वनविभागाच्या अधिका-यांना देण्यात आली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोसरे येथील जंगलात हा बिबटया मृतावस्थेत आढळून आला.
वनाधिका-यांनी त्याचा मृतदेह सायंकाळी पिंपळी येथील वनविभागाच्या रोपवाटीकेमध्ये आणला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचे दात व नखे सुस्थितीत होती. तारांच्या कुंपणावर सातत्याने पंजाचा आघात झाल्याने तारा घुसून व मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होवून त्याचा मृत्यू झाला असावा, असे वनविभागाचे म्हणणे आहे.
शाब्बास !! अविनाश शिर्के ! तुम्ही तर पराक्रमी वीर निघालात !!!