अडीच वर्षे निधी अखर्चित, भाडय़ापोटी भरावे लागतात लाखो रुपये
अलिबाग – राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यास सप्टेंबर २०१४ मध्ये मंजुरी देण्यात आली आहे. अडीच वर्षापूर्वी १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने वेळोवेळी स्मरणपत्र देऊनही बांधकाम विभागाने प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही. गेली अडीच र्वष हा निधी वापराविना पडून आहे.
अलिबाग येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी एकूण ३ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यातील १ कोटी रुपयांचा निधी २०१५ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. मात्र, २०१७ साल उजाडले तरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू होऊ शकलेले नाही. अलिबाग येथील कोळीवाडा येथे मत्स्यव्यवसाय विभागाची जुनी इमारत आहे. ही इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे याच जागेत सुसज्य मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यास राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. यात मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राबरोबरच, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग कार्यालय आणि जिल्हा मत्स्यालय संकुल यांचा समावेश आहे.
जुनी इमारत मोडकळीस आल्याने येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र बंद करून खासगी जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. भाडय़ाच्या रकमेपोटी मोठी रक्कम मत्स्यव्यवसाय विभागाला खर्च करावी लागते आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन इमारतीचे बांधकाम तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. ३ कोटी ७३ लाख रुपयांच्या या सुसज्ज संकुलासाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. मत्स्यव्यवसाय विभागाने हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला होता. हा निधी जवळपास अडीच वर्ष वापराविना पडून आहे. तांत्रिक अडचणींची कारणे देत बांधकाम विभागाने या कामाबाबत काहीच हालचाल केलेली नाही. मत्स्यव्यवसाय विभागाने वेळोवेळी स्मरणपत्र देऊनही प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही.
मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम तातडीने सुरू व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी नुकतीच या संदर्भात कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांच्याशी चर्चा केली आहे. ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते. त्याने काम केले नाही. त्यामुळे नवीन ठेकेदार नियुक्त करण्यासाठी कार्यवाही सध्या सुरू आहे.
– अविनाश नाखवा, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय
फक्त मराठी माणसांना द्या ,महाराष्ट्राच्या baherun alelyana देऊ naka