सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडसाठी कुर्ला आणि विद्याविहार दरम्यान गर्डर जोडण्याबाबतच्या कामासाठी एमएमआरडीए आणि मध्य रेल्वेमधील चर्चा अखेर सफल ठरल्याने या मार्गातील अडथळा आता दूर झाला आहे.
मुंबई- सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडसाठी कुर्ला आणि विद्याविहार दरम्यान गर्डर जोडण्याबाबतच्या कामासाठी एमएमआरडीए आणि मध्य रेल्वेमधील चर्चा अखेर सफल ठरल्याने या मार्गातील अडथळा आता दूर झाला आहे. डिसेंबरपासून पुलावर गर्डरचे काम सुरू होणार आहे. रात्री उशिरा कुर्ला-विद्याविहारदरम्यान मेगाब्लॉक घेऊन हे काम हाती घेण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले.
हा मार्ग कुर्ला-विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळून जात असल्याने येथील पुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेची परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हा मार्ग रखडला होता. अखेर एमएमआरडीए व मध्य रेल्वे प्रशासनाच्या चर्चेमधून सकारात्मक तोडगा निघाला. रात्री उशिरा मेगाब्लॉक घेऊन हे काम केले जाणार आहे. एकू ण १४ गर्डर जोडावे लागणार आहेत. या सर्व गर्डरचे वजन सुमारे ८०० टन व उपनगरीय मार्गावरील हा सर्वाधिक वजनाचा पूल असणार आहे. ८ ते १० डिसेंबर रोजी मध्यरात्रीनंतर मेगाब्लॉक जोडणीच्या पूर्व तयारीसाठी मेगाब्लॉक घेतला जाईल. मात्र यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या प्रकल्पासाठी रेल्वे विभागाकडून मिळणा-या परवानग्या, प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन, खटले यांना तोंड देत हे काम सुरू आहे. सुमारे पाच हजारांहून अधिक प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. सांताक्रूझ जोडरस्ता अधिक परिणामकारक बनवण्यासाठी अमर महल जंक्शन येथे १,०९६ मीटर लांबीचा आणि १७ मीटर रुंदीचा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकल्पामुळे विमानतळ, पूर्व-पश्चिम उपनगरे तसेच ठाणे, नाशिक, नवी मुंबई, पुणे, पनवेल आणि त्याहीपुढे प्रवास करणा-या प्रवाशांची सोय होणार आहे. या जोडरस्त्याचा वापर सुमारे ५० हजारांहून अधिक वाहने करणार असल्याने वाहतूक कोंडीची समस्याही ब-याच अंशी कमी होणार आहे, असे एमएमआरडीएच्या अधिका-यांनी सांगितले.
Kasve pudhe gela sasa maghe rahila, far chhan MMRDA All the best