अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १० जुलै १९७८ रोजी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना केली.
अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १० जुलै १९७८ रोजी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना केली.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत हे महामंडळ कार्यरत असून महामंडळाचे अधिकृत भागभांडवल ५०० कोटी रु पयांचे असून ५१ टक्के भांडवल राज्य शासन व ४९ टक्के भागभांडवल केंद्र शासनाचे आहे. त्यानुसार महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना राबवित असून महामंडळाला निधी राज्य व केंद्र शासनाकडून प्राप्त होतो.
महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे असून सर्व जिल्ह्यात जिल्हा कार्यालये व विभागीय स्तरावर प्रादेशिक कार्यालये कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ए विंग, तळमजला, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे महामंडळाचे कार्यालय कार्यरत असून या कार्यालयामार्फत जिल्ह्यामध्ये विविध योजना राबविण्यात येत आहेत.
त्या अनुषंगाने फोटोग्राफी, सायकल दुकान, पानशॉप, जनरल स्टोअर्स, डेअरी, मंडप डेकोरेशन, इलेक्ट्रिकल शॉप, ब्युटीपार्लर, शेळय़ा-मेंढय़ा पालन, कुक्कुटपालन, हॉटेल ढाबा, फळे, भाजीविक्री, कापड विक्री, रेडिमेट गारमेंट, आईस्क्रीम पार्लर, कोल्ड्रिंक्स, बैलजोडी, भांडीविक्री, बुरु डकाम, नारळ विक्री, विणकाम, लाउडस्पीकर, मटण शॉप, कटलरी, पापड-लोणचे बनविणे, मिरची कांडप मशीन, पीठ गिरण, टी.व्ही. रिपेअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आयटम रिपेरिंग, ऑटो रिक्षा, मालवाहतूक, टेम्पो, टुरिस्ट वाहन खरेदी, दुग्धव्यवसाय, तसेच इतर कायदेशीर कोणताही व्यवसाय इत्यादींना अर्थ पुरवठा केला जातो. राबविण्यात येत असलेल्या योजना-
५० टक्के अनुदान प्रकल्प मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत.
प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त रु . १० हजापर्यंत अनुदान देण्यात येते व राहिलेली रक्कम बँकेमार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे ३ वर्षात करावयाची आहे.
बीजभांडवल योजना
महात्मा फुले विकास महामंडळाला प्राप्त होणा-या भागभांडवलामधून बीजभांडवल योजना राबविण्यात येते. योजनेचे स्वरूप खालीलप्रमाणे
प्रकल्प मर्यादा ५०,००० रुपये ते ५ लाख रुपयांपर्यंत
प्रकल्प मर्यादेच्या २० टक्के बीजभांडवल कर्ज महामंडळामार्फत ४ टक्के द.सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. या राशीमध्ये महामंडळाच्या अनुदानाचा १०,००० रुपयांचा समावेश आहे.
बँकेचे कर्ज ७५ टक्के देण्यात येते व या कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो.
महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार ३ ते ५ वर्षांच्या आत करावी लागते.
अर्जदारास ५ टक्के स्वत:चा सहभाग भरावयाचा आहे.
उपरोक्त योजनांकरिता इच्छुक अर्जदार हा १८ ते ५० वयोगटातील असणे आवश्यक असून तो अनुसूचित जाती / नावबौद्ध संवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच त्याची उत्पन्न मर्यादा १ लाखापर्यंत असावी. तरी पात्र उमेदवारांनी अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्जाच्या मूळ व झेरोक्स स्वरूपात दोन प्रती, नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, सक्षम अधिका-याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडलेला दाखला/ जन्माचा दाखला, सक्षम अधिका-यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा दारिद्रय़रेषेखालील दाखला (वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ग्रामीण व शहरी भागासाठी १ लाख), शिधा वाटप पत्रिका (रेशन कार्ड), दारिद्रय़ रेषा योजनेंतर्गत किंवा शासकीय योजनेतून यापूर्वी कर्ज किंवा अनुदानाचा लाभ घेतला नसल्याबाबतचा ग्रामसेवक यांचा दाखला, व्यवसायाचे कोटेशन ( ५० टक्के अनुदान योजनेंतर्गत भाजीपाला या व्यवसायाकरिता कोटेशनची आवश्यकता नाही.), व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे ना-हरकत प्रमाणपत्र, पोलीस पाटील/ सरपंच यांचा रहिवासी दाखला, आधार कार्ड / पॅन कार्ड/ मतदान कार्ड तसेच कर्ज प्रकरणाच्या/ व्यवसायाच्या अनुषंगाने इतर कागदपत्रे जोडावीत. तसेच याशिवाय बीजभांडवल योजनेसाठी अर्जासोबत वाहन खरेदीसाठी लायसन्स, परमीट, बॅच नंबर व आर.टी.ओ. ची कागदपत्रे आणि प्रकल्प किंमत एक लाखाच्या वर असल्यास प्रकल्प अहवाल आदी कागदपत्रे जोडावीत.
तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्यादित), सिंधुदुर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ए विंग, तळमजला, सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे, तसेच जिल्हा व्यवस्थापक एस.एल. गायकवाड यांना (०२३६२) २२८०३९ व ९७०२०४६५२० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
– अर्चना जगन्नाथ माने, माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग
Nice