पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर झुकलेले छायाचित्र पोस्टरवर झळकवून आपल्या मनातील खदखद व्यक्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेनेने चालवला आहे.
मुंबई – भाजपाकडून अपमानाचे अनेक घोट पचवून जेरीला आलेली शिवसेना सैरभैर झाली असून, तरीही आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत, हे दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर झुकलेले छायाचित्र पोस्टरवर झळकवून आपल्या मनातील खदखद व्यक्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेनेने चालवला आहे.
त्यावर ‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर आमचे नेते झुकायचे तसेच त्यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यासमोर झुकावे काय? तशी शिवसेना नेतृत्वाची अपेक्षा असेल तर ती चूक आहे.’’ अशा सडेतोड शब्दांत भाजपाचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी शिवसेनेला सुनावले आहे. तर केवळ सत्तेसाठी आम्हाला शिवसेनेला सहन करावे लागत आहे, अशा शब्दांत अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आपली हतबलता व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाचे सरकार असले तरी त्यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. शिवसेनेला सत्तेत सामावून घेतले असले तरी भाजपाकडून वारंवार अपमान केला जात आहे. या अपमानाने सैरभैर झालेल्या शिवसेनेला आपले जुने दिवस आठवू लागले असावेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा ‘मातोश्री’वर मोठमोठे भाजपाचे नेते येऊन झुकत होते.
आता आपल्याला कोणी हिंग लावून विचारीत नसल्याची सल शिवसेना नेतृत्वाच्या मनात सलत असावी. म्हणूनच बुधवारी शिवसेना भवनासमोर एक पोस्टर झळकले. ज्यावर मध्यभागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे अनेक नेते शिवसेनाप्रमुखांसमोर झुकल्याचे दाखविण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर –
विसरले ते दिवस कसे हे,
की ढोंग वरकरणी,
झुकल्या होत्या यांच्या
गर्विष्ठ माना साहेबांच्या चरणी..!
अशा भाजपा नेत्यांच्या वर्मावर घाव घालणाऱ्या ओळी चितारण्यात आल्या आहेत. या पोस्टरने मुंबईसह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस तेथे दाखल झाले. त्यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांत काही काळ चकमक झाली. अखेर पोलिसांनी शिवसेना भवनासमोरील पोस्टर काढून टाकले. तरीही घाटकोपर, अंधेरी येथील पोस्टर्स रात्री उशिरापर्यंत तेथे झळकत होते.
सत्तेमध्ये राहून आपले उपद्रव मूल्य दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेच्या या आगाऊपणाचा भाजपाने चांगलाच समाचार घेतला आहे. या प्रकरणी बोलताना भाजपाचे प्रवक्ते गिरीश व्यास म्हणाले की, ‘‘बाळासाहेब ठाकरे यांचे एक वेगळे स्थान होते. त्यांच्याविषयी लोकांच्या मनात आदर होता.
वयानेही ते ज्येष्ठ होते. म्हणून त्यांच्यासमोर लोक नतमस्तक होत होते. तसेच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर झुकावे अशी अपेक्षा आहे काय? तशी अपेक्षा असेल तर ती चूक आहे. कदाचित भविष्यात आदित्य ठाकरे हेच नरेंद्र मोदींच्या समोर झुकलेले दिसतील.’’ असा सणसणीत टोला व्यास यांनी लगावला आहे.
सत्तेसाठी शिवसेनेला किती दिवस सहन करायचे?-गिरीष बापट
राज्यात मोठा भाऊ म्हणून भाजपा-शिवसेना युतीत आमचे स्थान आहे. त्यामुळे सत्ता टिकविण्यासाठी आम्ही सर्वकाही सहन करीत आहोत, अशा शब्दात अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी आपली हतबलता व्यक्त केली आहे. मात्र तोंडात पाणी जाऊ लागल्यास योग्य वेळी वेगळा निर्णयही घेतला जाऊ शकतो, असा इशाराही बापट यांनी दिला आहे.
बापट म्हणाले की, आम्ही मोठा भाऊ असल्याने सत्ता टिकविण्यासाठी सहन करावे लागत आहे. त्यावर शिवसेना स्वत:ला मोठा भाऊ समजते, मागील युतीच्या सरकारमध्ये तुम्हीही शिवसेनेला मोठा भाऊ मानत होता, तर मग आता तुम्ही मोठे भाऊ कसे झालात? असे विचारले असता बापट म्हणाले की, राजकीय परिस्थिती बदलते आणि मग कुणी मोठय़ाचा छोटा होतो आणि छोटय़ाचा मोठा होता.
परिस्थितीनुसार स्वीकारले पाहिजे. दरम्यान पोस्टर लावण्याचे पक्षाचे आदेश नव्हते, मात्र युतीचा इतिहास हे सर्व जाणतात. आम्ही जे काही असेल ते तोंडावर बोलतो, मात्र पोस्टर लावण्यासंदर्भात अधिकृत सूचना शिवसेनेतर्फे देण्यात आल्या नव्हत्या, असे शिवसेनेने सांगितले.
सत्ता सत्ता अन लोक झाले भिकारी ……घे सत्ता घरात