ऐन दिवाळीत सर्वत्र दिव्यांच्या रोषणाईत दीपावली साजरी होत असताना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे एका अत्यंत गरीब गर्भवती महिलेचा आणि तिच्या बाळाचा जीव धोक्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई- ऐन दिवाळीत सर्वत्र दिव्यांच्या रोषणाईत दीपावली साजरी होत असताना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे एका अत्यंत गरीब गर्भवती महिलेचा आणि तिच्या बाळाचा जीव धोक्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने यंदाच्या अर्थसंकल्पात गाजावाजा करत हाती घेण्यात आलेल्या ‘सुरक्षित मातृत्व अभियान’ या कार्यक्रमालाच पायदळी तुडवण्याचा प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयाने केल्याचे या घटनेमुळे सिद्ध झाले आहे. केवळ पैशांच्या अभावामुळे गरीब गर्भवती महिलेला उपचारांऐवजी हाकलावून लावण्यापर्यंत या रुग्णालयातील कर्मचा-यांची मजल गेली.
प्रहार कौल-
[poll id=”816″]
मीना नरवडे (२०) असे या महिलेचे नाव आहे. ती पती आणि दोन मुलांसह कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स येथील साईधाम मंदिराजवळील पुलाखाली राहते. पती बेरोजगार आणि अशिक्षित असून मिळेल ते काम आणि मंदिराच्या अन्नछत्रातून मिळणा-या जेवणावरच आपल्या दोन मुलांसह उदरनिर्वाह चालवावा लागतो. सोमवारी मध्यरात्री मीनाच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिच्या पतीने तिला आधीपासून उपचार सुरू असलेले शताब्दी रुग्णालय गाठले. मात्र, त्यांची हलाखीची स्थिती ठाऊक असल्याने तेथील कर्मचा-यांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. ‘तुम्ही भिकारी उपचारासाठी पैसे कुठून आणणार? तुझ्या अंगात रक्त नसल्याने रक्ताच्या बाटल्यांसाठी भरमसाठ पैसे लागणार ते कुठून आणणार?
उपचारासाठी पैसे नाहीत, तर येऊ नका, तुम्ही केईएम रुग्णालयात जा’, असे सांगत मीना आणि तिच्या पतीला परिचारिकेने रुग्णालयातून हाकलवून दिल्याचे मीनाने ‘प्रहार’ला सांगितले. पोटातील कळांमुळे कळवळणा-या मीनाने अखेर साईधाम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जोशी यांच्याशी संपर्क साधून त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. ट्रस्टकडून मदत उपलब्ध होईपर्यंत उपचार सुरु करा, अशी ट्रस्टच्या वतीने केलेली विनंतीही संबंधित परिचारिकेने मान्य केली नाही. त्यामुळे, ट्रस्टच्या वतीने मीनाला कांदिवलीच्या ‘धन्वंतरी’ या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा मीनाच्या शरीरात केवळ ६ ग्रॅम रक्त असल्याने सात महिन्यांनंतरही बाळाची वाढ योग्य पद्धतीने झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. सध्या मीनावर धन्वंतरी येथेच साईधाम ट्रस्ट व धन्वंतरी रुग्णालयाच्या आर्थिक मदतीने उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाल्यावर ‘प्रहार’ने मीनाकडून शताब्दी रुग्णालयाचे केसपेपर मिळवले आणि शताब्दी रुग्णालयाच्या डॉक्टरांशी संपर्क साधला. तेव्हा, मीनाच्या उपचाराबाबत सुरुवातीपासून हलगर्जीपणा झाल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कृष्णकांत पिंपळे यांनी मान्य केले आणि संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचेही आश्वासन दिले.
मीनाला जेव्हा आमच्याकडे आणले तेव्हा तिच्या रक्तात ६ ग्रॅम हिमोग्लोबिन असल्याचे चाचणीनंतर लक्षात आले. सात महिन्यांची गरोदर मीना अशा स्थितीत अपु-या दिवसांच्या बाळंतपणासाठी सक्षम नसून तिच्या आणि तिच्या बाळालाही धोका निर्माण होऊ शकतो. तिच्यावर आधीपासून योग्य उपचार अपेक्षित होते. आता सध्या तिची तब्येत सुधारावी, तिच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून आणखी काही दिवस तरी तिला रुग्णालयात ठेवावे लागेल. – डॉ. श्वेता दुबे, स्त्रीरोगतज्ज्ञ, धन्वंतरी रुग्णालय
या प्रकरणाची आम्ही गंभीरतेने दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मीनाच्या अंगात रक्ताची कमतरता असतानाही तिला आमच्या रुग्णालयात उपचार दिले गेले नाहीत, ही निश्चितच खेदजनक बाब आहे. ज्या डॉक्टरांनी आपल्या जबाबदा-या पार पाडण्यात दुर्लक्ष केले असेल, त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. – डॉ. कृष्णकांत पिंपळे, अधिष्ठाता, शताब्दी रुग्णालय
ह्या बयेवर आता उपचार करा ,म्हणजे पुढच्या वर्षी चवथ बाळ हि बया जन्माला घालील , जय महाराष्ट्र !!!!