‘टिटवी’ हा लघुपट टिटवी पक्ष्याच्या संपूर्ण जीवनचक्रावर आधारित असा अतिउत्कृष्ट लघुपट असून एखाद्या पक्ष्याच्या संपूर्ण जीवनचक्रावरचा हा महाराष्ट्रातील पहिला यशस्वी लघुपट आहे, पक्षीसंवर्धनासाठी तो अत्यंत मोलाचा आहे, असे उद्गार प्रसिद्ध वन्यजीव संशोधक मारुती चितमपल्ली यांनी काढले.
वर्धा- ‘टिटवी’ हा लघुपट टिटवी पक्ष्याच्या संपूर्ण जीवनचक्रावर आधारित असा अतिउत्कृष्ट लघुपट असून एखाद्या पक्ष्याच्या संपूर्ण जीवनचक्रावरचा हा महाराष्ट्रातील पहिला यशस्वी लघुपट आहे, पक्षीसंवर्धनासाठी तो अत्यंत मोलाचा आहे, असे उद्गार प्रसिद्ध वन्यजीव संशोधक मारुती चितमपल्ली यांनी काढले. अमरावतीचे वन्यजीव लेखक प्र.सु. हिरुरकर यांनी तयार केलेल्या टिटवी व्हीडिओ लघुपटाच्या सीडीचे अनावरण चितमपल्ली यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर त्यांना भावलेली ही ‘टिटवी’ (लघुपट) युट्युबवर अपलोड करून ग्लोबल करण्यात आली. त्यावेळी चितमपल्ली यांनी हे उद्गार काढले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक (माहिती) मोहन राठोड, माजी संचालक शरद चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, अनील ठाकरे, राकेश चौधरी आदी उपस्थित होते.
चितमपल्ली म्हणाले, निसर्गाचा समतोल राखण्यात टिटवीसह इतर सर्व पक्षी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. जैवविविधता वाचवायची असेल तर प्र.सु.हिरुरकर यांनी ‘टिटवी’ सारखा परिपूर्ण व्हीडिओ लघुपट इतर पक्ष्यांवरही तयार करावा अशी इच्छा मारुती चितमपल्ली यांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक पक्षी हा शेतक-याचा मित्र असून घुबडसारखा पक्षी शेतीतील उंदीर, घुशींचा कसा नायनाट करतात याचे उदाहरण त्यांनी दिले. तसेच हा लघुपट इंग्रजीमध्ये तयार करावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
टिटवी या व्हीडिओ लघुपटाचे दिग्दर्शन, कॅमेरा आणि लेखन अमरावतीचे वन्यजीव अभ्यासक प्र.सु.हिरुरकर यांनी केले असून संपादन आणि साउंडचे काम नि.रा.खंडारकर यांनी केले आहे.
टिटवी पक्ष्याच्या दिवसरात्र सजग राहण्याच्या वृत्तीमुळे शिका-यांना इतर पक्ष्यांच्या शिकारीमध्ये फार मोठा अडथळा व्हायचा. त्यामुळे या पक्ष्याच्या नायनाटाकरिता शिका-यांनी त्यावेळी टिटवीच्या घरटयात परिस असतो अशी लोककथा विणली. त्यामुळे टिटवीच्या घरटयांचा विध्वंस लोक करू लागले आणि या पक्ष्याच्या कुळाच्या नाशात त्याचा विपरित परिणाम झाला. मात्र टिटवीसारख्या पक्ष्यावर साकारलेला ‘टिटवी’हा लघुपट या पक्ष्याच्या संवर्धन आणि संरक्षणात अत्यंत मोलाचा ठरू शकतो, असे मतही यावेळी मारुती चितमपल्ली यांनी या वेळी व्यक्त केले. लघुपटाचे एडिटिंगचे काम कौशल्यपूर्ण हाताळल्याबद्दल नि.रा.खंडारकर यांचा या वेळी चितमपल्ली यांनी सत्कार केला.
please share the youtube link of this video too.