आंतरराष्ट्रीय परिमाण लाभलेला बौद्धधर्म हा प्राचीन भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. गेल्या हजार वर्षात आशिया खंडातील अनेक देशांमध्ये या धर्माचा प्रसार व विकास झाला आहे.
आंतरराष्ट्रीय परिमाण लाभलेला बौद्धधर्म हा प्राचीन भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. गेल्या हजार वर्षात आशिया खंडातील अनेक देशांमध्ये या धर्माचा प्रसार व विकास झाला आहे. श्रीलंका, चीन, जपान, इंडोनेशिया, तिबेट येथील वैविध्यपूर्ण संस्कृतींवर या धर्माचा मोठा प्रभाव दिसून येतो.
बौद्ध धर्माचे केवळ ऐतिहासिक किंवा तत्त्वज्ञानपर महत्त्व नसून त्याला प्राप्त झालेले सामाजिक, सांस्कृतिक इतकेच नाही तर भाषाशास्त्रीय आयाम आणि त्यांचा तौलनिक अभ्यास यामुळे दिवसेंदिवस यातील अध्ययनाच्या व संशोधनाच्या कक्षा रुंदावतच आहेत.
बौद्धधर्माच्या या वैशिष्टय़ांमुळेच जगभरातील लोकांचा याकडे ओढा वाढतो आहे. बौद्ध धर्माच्या सांगोपांग अध्ययनाची गरज व यातील संशोधनाच्या संधी लक्षात घेऊनच के. जे. सोमैय्या सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीज या संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये पीएच.डी. संशोधनासोबतच,एम.ए. इन बुद्धिस्ट स्टडीज(मुंबई विद्यापीठांतर्गत) व इतर प्रमाणपत्र तसेच पदविका अभ्यासक्रमांचाही समावेश होतो.
एम.ए. इन बुद्धिस्ट स्टडीज या अभ्यासक्रमाची रचनाच इतिहास, तत्त्वज्ञान तसेच पाली, बौद्ध, संकर-संस्कृत व तिबेटी भाषांमधील बौद्ध साहित्य या सर्वाचा अंतर्भाव करणारी आहे. या व्यतिरिक्त बौद्ध धर्माचा कला व स्थापत्यावरील प्रभाव, भारताबाहेर त्याचा प्रसार व विकास, आधुनिक काळात सामाजिक कार्यातील बौद्ध धर्माचे योगदान स्पष्ट करणारी ही चळवळ असा सर्वसमावेशक अभ्यासक्रम हे याचे वैशिष्टय़ म्हणता येईल.
देशभरातील मान्यवर विद्वानांच्या सहकार्याने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामुख्याने सोमैय्या बुद्धिस्ट स्टडीज सेंटरच्या शिक्षकांनी, मुंबई विद्यापीठाकरिता या अभ्यासक्रमाची रचना केली. बौद्ध अध्ययन क्षेत्रात अधिक व्यापक व सखोल अभ्यासक्रमांपैकी एक म्हणून याकडे पाहिले जाते. त्यामुळे या क्षेत्रात मौलिक संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. तत्त्वज्ञान (Philosophy), कलांचा इतिहास (Art History), भाषाशास्त्र (Linguistics), संस्कृतीचा अभ्यास (Cultural Studies), मनोविेषण (Psycho – therapy), हस्तलिखितशास्त्र (Manuscriptology), पर्यटन क्षेत्र (Travel & Tourism), म्युझिअम-कन्झर्वेशन, पुरातत्त्व (Archaeology) अशा सर्वच क्षेत्रांमध्ये याची उपयोगिता सिद्ध होऊ शकते.
के. जे. सोमैय्या सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीज ही संस्था स्थापनेपासूनच बौद्ध अध्ययनास व संशोधनास उत्तेजन देत आली आहे. मुंबई विद्यापीठातर्फे पदव्युत्तर संशोधनाकरिता संस्थेला मान्यताप्राप्त आहे. गेल्या बावीस वर्षात संस्थेने विविध देशांतील प्रथितयश विद्वानांच्या सहकार्याने अनेक संशोधन प्रकल्प पूर्णत्वास नेले आहेत. यात प्रामुख्याने श्रीलंका, जपान, चीन, युरोप व दक्षिण-पूर्व आशियातील इतर काही देशांचा समावेश होतो. या सर्व विद्वानांना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने दर दोन वर्षानी आंतरराष्ट्रीय परिषदेचेही आयोजन केले जाते.
बौद्ध तत्त्वज्ञान व साहित्य यातील संशोधनासोबतच बौद्ध धर्मातील मूल्यांची आधुनिक युगातील समस्या सोडविण्याकरिता कशाप्रकारे मदत होऊ शकते याविषयीचे विचारमंथनही अशा परिषदेच्या माध्यमातून घडते. तौलनिक अभ्यास व संशोधनास अधिक महत्त्व दिले जात असले तरीही मूळ बौद्ध ग्रंथांच्या अध्ययनाचे महत्त्व नाकारता येत नाही. याकरिता, परंपरागत व सखोल अध्ययन करणा-या विविध संघातील भिक्षू व भिक्षुणीचे सहकार्यही संस्था वेळोवेळी घेत असते.
संस्थेमध्ये उपलब्ध प्रमुख अभ्यासक्रम
(मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत) :
पी. एचडी अभ्यासक्रम (Philosophy, Ancient Indian Culture, Pali, Sanskrit),
एम. ए. इन बुद्धिस्ट स्टडीज (पुढील संकेतस्थळावर उपलब्ध: http:// www.mu.ac.in / syllabus / 4.20% 20 Buddhist%20 AIC.pdf),
योग प्रशिक्षण पदविका आणि प्रगत पदविका अभ्यासक्रम
याव्यतिरिक्त बौद्ध अध्ययन प्रमाणपत्र अभ्यासक्रम (मराठी व इंग्रजी माध्यम), पाली प्रमाणपत्र अभ्यासक्रम संस्थेतर्फे चालविले जातात.
संस्थेच्या उपक्रमांविषयी अधिक माहितीकरिता येथे संपर्क करावा. कार्यालय दूरध्वनी – ०२२ – २१० २४३३८ / २१०२२५३७ ई-मेल – director.buddhist@somaiya.edu
खूप चं छान आहे या मुले बुद्ध धर्माचा आय्भास करता येल आणि जीवन सुखमय करता येल