देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत दिल्या गेलेल्या अपमानास्पद वागणुकीचे बुधवारी राज्यसभेत तीव्र पडसाद उमटले.
नवी दिल्ली – देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत दिल्या गेलेल्या अपमानास्पद वागणुकीचे बुधवारी राज्यसभेत तीव्र पडसाद उमटले. विरोधीपक्षनेते अरुण जेटली यांनी खोब्रागडेंना दिल्या गेलेल्या वागणूकीचा तीव्र निषेध करत सरकारने यासंदर्भात कठोर पावले उचलावीत असे सांगितले.
परराष्ट्रीय धोरणामध्ये जर आपल्याला क्षुल्लक समजले जात असेल तर अशा घटना वारंवार होऊ शकतात. परराष्ट्रीय धोरणांमध्ये आपले स्थान काय याचे आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे जेटली यांनी यावेळी सांगितले बहुजन समाज पार्टीच्या नेता मायावती यांनीही याला दुजोरा देत सरकारने या प्रकरणावर लवकरात लवकर कठोर पावले उचलावीत असे सांगितले.
तसेच कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी यांनीही हे प्रकरण इतर कोणत्याही देशाने खपवून घेतले नसते. आपल्याला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असे सांगितले. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी अमेरिकेवर तोफच डागण्यास सुरुवात केली. भारतातील अमेरिकन दूतवासांना मिळणा-या विशेषाधिकारांचा आढावा घेतला गेला पाहिजे असे तृणमूल नेत्यांनी सांगितले.
समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनीही प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे आज पुन्हा एकदा राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
apala khobragade virodhatala lekh vachala baraka 🙂