राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील ५६ मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
नवी दिल्ली- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील ५६ मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर यांना जाहीर झालेला मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार त्यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी या वेळी स्वीकारला.
राष्ट्रपती भवन येथे शनिवारी झालेल्या विशेष समारंभात राष्ट्रपतींनी एक पद्मविभूषण, ११ पद्मभूषण आणि ४४ पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. भारतातील योगाभ्यास जगभरात लोकप्रिय करणारे प्रसिद्ध योग गुरू बेल्लूर कृष्णमचार सुंदरजा अय्यंगार यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तर इस्रेचे अध्यक्ष कोप्पील्लील राधाकृष्णन, प्रसिद्ध संशोधक विनोद प्रकाश शर्मा, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सचे संचालक आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ पी. बलराम, न्यायमूर्ती दलवीर भंडारी, प्रसिद्ध लेखक रस्कीन बाँड, विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव थीरुमलचारी रामासामी, टेनिसपटू लिएंडर पेस यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच मॅनेजमेंट गुरू मृत्युंजय बी. अत्रेय, कृषिशास्त्रज्ञ मदप्पा महादेवप्पा, आणि शिक्षणतज्ज्ञ गुलाम महंमद शेख यांनाही पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर गुजराती विश्वकोषाचे निर्माते धीरुभाई प्रेमशंकर ठक्कर यांना मरणोत्तर पद्म भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर तबलावादक विजय घाटे, सामाजिक कार्यकर्ते मुकुल चंद्र गोस्वामी, नेत्रतज्ज्ञ अमोल गुप्ता यांच्यासह ४४ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
यावर्षी प्रजासत्ताक दिनी १२७ जणांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. ३१ मार्च रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात ६६ जणांना यापूर्वीच हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
bekaar….!