महाराष्ट्रात आढळणा-या प्राण्यांच्या दुर्मीळ प्रजाती कुडाळ व सावंतवाडी तालुक्यात आढळल्या आहेत. यात रंगीत वटवाघुळ, विविध रंग असलेले फुलपाखरू, वामन खंडया, रंग बदलणारा सरडा आढळला आहे.
कुडाळ- महाराष्ट्रात आढळणा-या प्राण्यांच्या दुर्मीळ प्रजाती कुडाळ व सावंतवाडी तालुक्यात आढळल्या आहेत. यात रंगीत वटवाघुळ, विविध रंग असलेले फुलपाखरू, वामन खंडया, रंग बदलणारा सरडा आढळला आहे.
यातील विविध रंग असलेले फुलपाखरू महाराष्ट्रात कुठेही प्रजाती आढळून येत नाही; ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली आहे. या दुर्मीळ प्राण्यांचा शोध संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. मंगेश जांबळे, डॉ. योगेश कोळी, प्राध्यापक संजय कांबळे यांनी गेल्या महिन्यात घेतला आहे.
सिंधुदुर्गातील कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात आढळणा-या आणि अस्तित्व धोक्यात असणा-या प्राण्यांच्या वेगवेगळया चार प्रजातीची नोंद करण्यात आली आहे. यात रंगीत वटवाघुळ या वटवाघळाच्या अत्यंत छोटया प्रजातीची नोंद झाली आहे. हे वटवाघुळ ठसठसीत नारिंगी-भगव्या रंगाचे असून त्याचे पंख काळसर आहेत. तर बोटे भगवी आहेत.
या प्रजातीचे एक वटवाघळ पाट येथील राजू म्हसकर यांच्या केळीच्या बागेत आढळले. याकामी कनिष्ठ महाविद्यालयाचे जीवशास्त्राचे प्राध्यापक विजय मेस्त्री यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याआधी वटवाघळाची ही प्रजाती एक वर्षापूर्वी प्रा. डॉ. मंगेश जांबळे यांनी देवगड तालुक्यातही नोंदवलेली आहे.
तसेच वालावल येथील मुख्य तलावानजीकच्या जंगलात डॉ. योगेश कोळी यांनी फुलपाखराच्या ‘क्लिपर’ प्रकारातील ‘पार्थनॉस सिल्व्हिया’ प्रजातीची नोंद केली. वालावल येथे हे फुलपाखरू ४ ऑक्टोबर रोजी आढळले. तसेच वामन खंडया या पक्षाच्या अत्यंत दुर्मीळ प्रजातीची नोंदही संत राऊळ महाराज महाविद्यालयातील संगणक विभागातील प्रा. खेमराज कुबल यांना वेंगुर्ले येथे किरकोळ जखमी अवस्थेत हा पक्षी त्यांच्या घराजवळ ७ ऑक्टोबर रोजी मिळाला.
त्यांनी तो महाविद्यालयात आणल्यावर तो वामन खंडया असल्याचे निदर्शनास आले. खंडया पक्ष्यांची ही जात अत्यंत दुर्मीळ असून सद्यपरिस्थितीत ही प्रजाती कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांतच आढळते. या पक्षाचे पाय गुलाबी असून त्यांना पुढील बाजूस दोन व मागील बाजूस एक बोट असल्याने याला ‘तिबोटी खंडया’ असेही म्हणतात.
महाविद्यालयात आणला गेलेला पक्षी नंतर यशस्वीरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आला. या पक्षाच्या अस्तित्वाची नोंद याआधी कोनशी (सावंतवाडी) आणि नरेंद्र डोंगर (सावंतवाडी) येथे झालेली आहे.
तसेच याबरोबरच या प्राध्यापक टीमने ‘सरडा’ प्रकारातील ‘शॅमेलिऑन’ या अत्यंत वैशिष्टय़पूर्ण व अस्तित्व धोक्यात आलेल्या प्रजातीची नोंदही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागांत वारंवार केली आहे. सिंधुदुर्गातील विविध वनस्पती व प्राणी प्रजातींचा सखोल अभ्यास होणे आहे. या विभागाने केलेल्या कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. जी. भास्कर यांनी अभिनंदन केले आहे.
सुंदर पक्षी आहेत
&सुंदर असा लेख आहे . माझ्या कडून सुभेच्या हैप्पी दिवाळी