मुंबईत गेल्या काही दिवसांत लोकलमध्ये स्टंटबाजी करणा-यांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर दुर्घटनाही वाढत आहेत.
मुंबई- मुंबईत गेल्या काही दिवसांत लोकलमध्ये स्टंटबाजी करणा-यांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर दुर्घटनाही वाढत आहेत. अशा स्टंटबाजांना लगाम घालण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोहमार्ग पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. गेल्या वर्षभरात लोअर परळ ते माहीम स्थानकादरम्यान ६०० स्टंटबाजांवर कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये निम्म्याहून अधिक अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
मुंबईच्या लोकलमधून प्रवास करताना दारात लटकणे, लोकल सुटल्यानंतर फलाट संपेपर्यंत लोकलमधून पाय बाहेर काढून घासत जाणे, दुस-या बाजूने येणा-या लोकलमधील प्रवाशांना टाळी देण्याचा किंवा टपली मारण्याचा प्रयत्न करणे, चालत्या लोकलच्या छतावर चढून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार सर्रास दिसून येतात. हीच स्टंटबाजी मग जिवावर बेतते. गेल्या काही दिवसांत स्टंटबाजांची आणि त्यातून अपघात घडण्याची संख्याही वाढली आहे.
पश्चिम रेल्वेने लोअर परळ ते माहीम या स्थानकादरम्यान वर्षभरात ६०० स्टंटबाजांवर कारवाई केली. त्यात १५ वर्षाखालील ३६० मुलांचा समावेश आहे, अशी माहिती त्रिवेदी यांनी दिली.
अशी स्टंटबाजी करताना कोणी दिसल्यास प्रवाशांनी त्वरित ९८३३३३११११ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन त्रिवेदी यांनी केले.
स्टंटबाजांना लगाम घालण्यासाठी प्रत्येक मंगळवारी विशेष मोहीम हाती घेतली जाते. सोमवारी रात्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्याकरता जाणा-या तरुणांचा मोठा भरणा असतो. रात्री उशिरा आणि पहाटे लोकलमध्ये त्यांची स्टंटबाजी सुरू असते. याचवेळी सापळा लावून त्यांना पकडले जाते.
हे सर्वजण रजनीकांतचे ” चेले ” आहेत काय ???????