‘‘जगाचा शैक्षणिक ‘गुरू’ बनण्याची क्षमता भारतामध्ये आहे,’’ असे मत भारतीय वंशाचे अमेरिकी शिक्षणतज्ज्ञ हॅरी अरोरा यांनी व्यक्त केले.
वॉशिंग्टन- ‘‘सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणि तांत्रिक संसाधने उपलब्ध असल्याने जगाचा शैक्षणिक ‘गुरू’ बनण्याची क्षमता भारतामध्ये आहे,’’ असे मत भारतीय वंशाचे अमेरिकी शिक्षणतज्ज्ञ हॅरी अरोरा यांनी शनिवारी व्यक्त केले.
जगातील प्रतिष्ठेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि हावर्ड केनेडी स्कूलतर्फे ‘हावर्ड इंडिया कॉन्फरन्स’ आयोजित केली आहे. या परिषदेत प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या परिषदेत ‘आय टय़ूटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी हॅरी अरोरा हे ‘भारतातील सिलिकॉन व्हॅलीचा विकास’ या विषयावरील परिसंवादात सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी भारतीय गुणवत्तेचे कौतुक केले. ‘‘भारतात गुणवत्ता आणि तंत्रज्ञान यांची कमतरता नाही. या बळावरच ते जगाला ज्ञान देऊ शकतात, असे मत अरोरा यांनी व्यक्त केले.
‘भारत विरुद्ध भारत : प्रादेशिक सक्षमीकरण किंवा जागतिक विकास’ ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे सल्लागार सॅम पिट्रोदा आणि केंद्रीय मंत्री अजय माकन हेही या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. बिल-मेलिंडा गेटस् फाउंडेशनचे भारतातील माजी प्रमुख अशोक अलेक्झांडर, डिस्ने-युटीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ रॉय-कपूर आदींची भाषणे या परिषदेत होणार आहेत.
ashi gondos visheshane vaparun Bharat khari paristiti nakarat aahe.