दरवर्षी दिवाळीमध्ये वाचकांना वैचारिक फराळ पुरवणा-या दिवाळी अंकाच्या किंमतीत यंदा २० ते ३० टक्के दरवाढ होणार आहे.
मुंबई- दरवर्षी दिवाळीमध्ये वाचकांना वैचारिक फराळ पुरवणा-या दिवाळी अंकाच्या किंमतीत यंदा २० ते ३० टक्के दरवाढ होण्याचे संकेत जवळपास सर्वच प्रकाशकांनी दिले आहेत. त्यामुळे शंभर रुपयांना मिळणा-या दिवाळी अंकांची किंमत आता सव्वाशे रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.
अनेक प्रकाशक हे दिवाळी अंकाच्या छपाईसाठी परदेशी ‘न्यूज प्रिंट’ कागदाबरोबरच इतर प्रकारच्या कागदाचा वापर करतात. पण गेल्या काही दिवसांपासून रुपयाच्या होणा-या अवमूलनामुळे परदेशातून आयात कराव्या लागणा-या या कागदासाठी प्रकाशकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहे. तसेच वाढत्या डिझेलच्या दरामुळे अंकाच्या वाहतुकीचे दरही वाढल्यामुळे ही भाववाढ केली जात असल्याचे सांगितले जात आहे. छपाईसोबत इतर खर्च वाढण्याचा परिणाम संपूर्ण प्रकाशन क्षेत्रावर होत असल्याचे गेल्या सहा-सात महिन्यात दिसून आले आहे.
केवळ दिवाळी अंकच नव्हे तर मराठीतल्या अनेक वाङ्मयीन नियतकालिकांनासुद्धा या दरवाढीचा फटका बसला असून, अनेक नियतकालिकांनी आपल्या वार्षिक वर्गणीच्या रकमेत वाढ केली आहे. मराठी साहित्यविश्वात दिवाळी अंकाना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. दिवाळी अंकाच्या माध्यमातून जुन्या-नव्या लेखकांचे लेख, कथा, कादंब-या, ललित, कविता यासारखे साहित्याचे विविध प्रकार एकाच वेळी वाचायला मिळत असतात. गेल्या काही महिन्यांपासून महागाईचे संकट झेलणा-या सर्वसामान्य जनतेला याही दरवाढीचा सामाना करावा लागणार आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कागदाच्या किमतीत ३० टक्के भाववाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी आमच्या अंकाची किंमत शंभर होती ती यावर्षी मात्र नाइलाजास्तव १२० रुपये करावी लागत आहे. – संजय भागवत, प्रकाशक, मौज प्रकाशन गृह
रुपयाच्या तुलनेत डॉलरचे वाढलेले भाव हे जरी यामागचे प्रमुख कारण असले तरी डिझेलच्या दरवाढीमुळे अंकाच्या वाहतुकीसाठीही जास्त पैसे मोजावे लागणे हे यामागचे आणखी एक कारण आहे. वाचकप्रियता कटाक्षाने पाळल्यास वाचक नक्कीच वाढलेल्या किंमतीसह दिवाळी अंक खरेदी करतील. – आनंद आगाशे, संपादक, आणि प्रकाशक माहेर, मेनका आणि जत्रा दिवाळी अंक
दिवाळी अंकाच्या किमतीत वाढ झाली असली तरी वाचकांची संख्या कमी होणार नाही, याचे कारण आज दिवाळी अंक हे वाचनालयातून किंवा सोसायटीमध्ये ग्रुप पद्धतीने वाचले जातात. त्यामुळे वाचकांवर याचा काहीच परिणाम होणार नाही. – विजय पाध्ये, अध्यक्ष, दिवा प्रतिष्ठान
स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी नसून या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-यानी आपल्या दिवाळी अंकाच्या सहा (6) प्रती नोंदणीकृत टपाल किंवा कुरिअर मार्फत या संस्थेकडे दिनांक 31 डिसेंबर 2014 पर्यंत किवा तत्पूर्वी पोहोचतील अशा बेताने डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक – आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर – 416101, तालुका – शिरोळ, जिल्हा – कोल्हापूर, महाराष्ट्र sunildadapatil@gmail.com, sunil77p@rediffmail.com, या पत्यावर पाठवाव्यात किंवा 02322 – 225500, 09975873569 या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेचा निकाल विजेत्या दिवाळी अंकाच्या नावासकट बातमीच्या माध्यमातून सर्व मान्यवर मराठी दैनिके, साप्ताहिके, आकाशवाणी केंद्रे, दूरदर्शन तसेच खासगी दुरचित्रवाहिन्याकडे प्रसिद्धीसाठी पाठवले जातील. तसेच या दरम्यान दिवाळी अंकांचे प्रदर्शनहि भरवण्यात येणार असून प्रदर्शनात मांडण्यासाठी दोन अंक पाठवावे. ज्यांनी स्पर्धेसाठी अंक पाठवलेले असतील त्यांनी प्रदर्शनासाठी वेगळे अंक पाठविण्याची आवश्यकता नाही. प्रदर्शनास कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. मागील वर्षी सर्व स्तरातून 500 पेक्षा अधिक दिवाळी अंक सहभागी झाले होते, प्रतिवर्षी दिवाळी अंकांची स्पर्धा वाढते आहे व स्पर्धकांचीही संख्या वाढते आहे. मागील स्पर्धेचा निकाल व संक्षिप्त अहवाल एखाद्या स्पर्धकाने लेखी मागणी केल्यास त्यास तो टपालाने पाठविला जाईल.