माणूस जगत असतो. जगता-जगता रमत असतो व्यवसायात, नोकरीत, मोलमजुरीत.. यातील काही व्यवसाय प्रतिष्ठा देतात.. काही घालवतात. प्रतिष्ठा घालवणा-या व्यवसायात काही प्रतिष्ठितही गुंततात.. चोरी-चोरी सुरू असते तेव्हापर्यंत त्यांचे फावते आणि जेव्हा त्यांचे उद्योग समाजासमोर येतात तेव्हा कमावलेल्या प्रतिष्ठेची माती होते.. सेक्स रॅकेट हा त्यातलाच एक उद्योग. गेल्या आठवडयात मुंबईत पोलिसांनी एका हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यात एका टीव्ही अभिनेत्रीसह चार मॉडेल्स पकडल्या गेल्या.. त्या कोण होत्या? त्यांचे नाव, गाव, चेहरे कुठेही प्रसिद्ध झाले नाहीत. प्रसिद्धी माध्यमं असा व्यवसाय करणाऱ्यांचे चेहरे प्रसिद्ध करत नसतात. त्यांची बदनामी होऊ नये, याची काळजी घेत असतात. बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र समाजमन त्यांना चार दिवस शोधत राहते.. ही असेल, ती असेल अशी संशयी नजर भिरभिरत राहते.. प्रतिष्ठित कलावंतांसाठी हे बरे नव्हे!
सुख कमावण्यासाठी माणूस रोज खपत असतो. पैशासाठी धावत असतो. कुणी दोन वेळच्या भाकरीसाठी जीवाचं रान करतो. कुणाला दोन हाताचे चार हात करायचे असतात. घर बांधायचे असते. पैसा येऊ लागतो. नव्या गरजा निर्माण होतात. जगण्यात आनंद देणारे नवे स्वप्न सजवले जातात. स्वप्नांचे इमले एकावर एक चढवले जातात. कलावंतही अशीच स्वप्न पाहत असतो. आपल्याला प्रसिद्धी मिळावी, चाहते निर्माण व्हावेत, आपले सर्वत्र कौतुक व्हावे, आपल्या अभिनयाला दाद मिळावी या अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन जगत असतो. आपल्या भूमिकेवर जिवापाड प्रेम करत असतो. भूमिकांमध्ये तल्लीन होत असतो. आपली भूमिका जेवढी रसिकांना आवडेल, तेवढीच अधिक आपली प्रतिष्ठा वाढेल, त्यापाठोपाठ मिळणा-या पैशातही वाढ होईल, हे साधं गणित सोडवत असतो. त्यातली एखाद् दुसरी अभिनेत्री अधिक पैसे कमावण्याच्या हावरटपणात वाहवत जाते. टीव्ही मालिका, चित्रपट, नाटक, मॉडेलिंग यातून मिळालेल्या वलयाचा फायदा घेऊन, शरीर विकायला निघते, तेव्हा ती कलावंत नसते.. ती कॉलगर्ल होते.
मुंबईच्या ओशिवरा भागात उच्चभ्रू सोसायटीत सेक्स रॅकेट असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गेल्या गुरुवारी रात्री धाड टाकली. त्यात एका वाहिनीवरील मालिकेत काम करणा-या प्रसिद्ध अभिनेत्रीचाही समावेश होता. तिच्यासह मॉडेलिंग क्षेत्रात काम करणा-या मॉडेल्सही आढळल्या. मुंबई, पुण्यासारख्या शहरांत हे उद्योग नवीन नाहीत. पण त्यात कलावंतही असावेत, हे धक्कादायक आहे. काही कलावंत असे अधून-मधून धक्के देण्याचे काम यापूर्वीही करत आले आहेत. कधी मद्यधुंद पाटर्य़ामध्ये, कधी मित्राच्या फ्लॅटवर धिंगाणा घालताना पकडले गेले आहेत. ते त्यांचे खासगी आयुष्य होते. त्यांनी स्वत:चा ताण-तणाव दारूच्या पेल्यात झिंगून उतरवावा किंवा ड्रग्जचे डोज घेऊन विसरावा, हे त्यांचे त्यांनीच ठरवावे. पण चित्रपट, नाटक, टीव्ही मालिकांमधील भूमिकांमधून समाजासमोर नैतिकता सांगायची आणि प्रत्यक्ष जगण्यातून कमरेचे सोडून डोक्याला बांधायचे, हे कशासाठी? कलावंतांनी याचे तारतम्य बाळगले पाहिजे, ही रसिकमनाची साधी अपेक्षा कुणासाठीही डोईजड होऊ नये.
सेक्स स्कँडलमध्ये सापडलेल्या तरुणींनी हा पार्टटाइम उद्योग करण्यासाठी वेळ काढला, हेही अचंबित करणारे आहे. टीव्ही मालिका आणि भोजपुरी चित्रपटात प्रसिद्ध पावलेल्या अभिनेत्रीने रात्री ही शरीरसेवा देण्याचा व्यवसाय करावा, ही एक कसरतच वाटते. कलावंतांना भेटण्यासाठी तारखा घ्याव्या लागतात. त्या मिळत नसतात. मालिका, चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळा सांभाळणे त्यांना कठीण जात असते. त्यात ‘कॉलगर्ल’चा पार्टटाइम बिझनेस करण्यासाठी ग्राहकाची प्रतीक्षा करत राहण्यापर्यंत या तथाकथित अभिनेत्रीने वेळ काढला. म्हणजे हा व्यवसाय करण्याचे शेडयुलिंग आखीव-रेखीवच असले पाहिजे. हा पार्टटाइम व्यवसाय करणारी ती एकटीच आहे, की आणखी कलावंत असेच शेडयुलिंग करून या धंद्यात गुंतले आहेत, याचाही तपास व्हायला हवा. यात पकडण्यात आलेला दलाल या पाच जणींच्या भरावशावर हा धंदा करत नसावा, त्यात आणखी पार्टटाइम ‘कॉलगर्ल’ सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हायप्रोफाइल सेक्स स्कँडलच्या बातम्या होतात. माध्यमांमध्ये त्याची चर्चा होते. त्यानंतर त्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांकडून काय माहिती मिळाली, आणखी कोणी त्यात गुंतले आहेत काय, हे रॅकेट फक्त मुंबई शहरापुरतेच होते की त्याचे धागेदारे इतर शहरांपर्यंत विणले गेले आहेत, यावर कुठलीही बातमी नंतर येत नसते. धाडीची चटपटीत बातमी देणारे नंतर ही फाइल अशी अंधारात का ठेवतात? उच्चभ्रू समाजातील लोकांची प्रतिष्ठा कलंकित होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे का? असे संशयित प्रश्न समाजमनात गर्दी करत असतात.
कलावंतांनी आपल्या क्षेत्राशिवाय इतरत्र कुठलेही पार्टटाइम उद्योग करायला हरकत नाही. पण जे धंदे समाजमान्य नाहीत, अशा उद्योगात त्यांनी पडू नये. वेश्या व्यवसाय करणा-या अनेक महिलांना या धंद्यात कुणीतरी फसवून गुंतवत असतो. किंवा जगण्यासाठी कुठलाच मार्ग शिल्लक राहत नसल्याने त्या ही वाट धरतात. त्यांची या व्यवसायातून सुटका होते तेव्हा त्या हे सारे सच्चेपणाने सांगत असतात. ज्या कलावंतांना पोलिसांनी पकडले, त्यांच्यावर हा समाजमान्य नसलेला धंदा करण्याची वेळ का आली, याची उकल होणे गरजेचे आहे. मॉडलिंग क्षेत्रात काम करणा-या तरुणींना स्वत:ला मेंटेन करण्यासाठी पैसे कमी पडत होते की त्यांच्या ऐयाशी करण्याच्या गरजांनी मर्यादा ओलांडली होती, याचाही शोध घेणे गरजेचे आहे. या सेक्स स्कँडलमध्ये असलेल्या तरुणी टीव्ही, चित्रपट, मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी आल्या आणि त्यांना काम देण्याचे आमिष दाखवून या उद्योगात ढकलले गेले काय? याचाही शोध घेणे गरजेचे आहे. पोलिसांनी सेक्स रॅकेट उजेडात आणले. त्या उजेडानंतर अनुत्तरित असलेल्या प्रश्नांचा अंधार दूर झाला पाहिजे. आणखी कुणी ‘हायप्रोफाइल’ या धंद्यात गुंतले असतील, त्यांची नावे सांगू नका. ती नावे अंधारातच ठेवा; पण या प्रकरणाच्या निमित्ताने अंधारात फसलेल्या कलावंतांच्या आयुष्यात उजेड पेरण्याचे काम तपास यंत्रणेने केले पाहिजे, एवढी अपेक्षा व्यर्थ ठरू नये.
अंधेर नागरी चोव्पट राजा
ये काय हो राहा है…..