सुमारे साडे सोळा कोटी वर्षापूर्वी गोंडवन हा महाखंड कशा प्रकारे तयार झाला त्याच्या निर्मितीचे प्रात्यक्षिक सादर करून पृथ्वीवर लाखो वर्षापूर्वी ऑस्ट्रेलिया, अंटाक्र्टिक व भारतीय भूपट्ट कोठे होते त्यांचे स्थान संशोधकांनी निश्चित केले आहे.
सुमारे साडे सोळा कोटी वर्षापूर्वी गोंडवन हा महाखंड कशा प्रकारे तयार झाला त्याच्या निर्मितीचे प्रात्यक्षिक सादर करून पृथ्वीवर लाखो वर्षापूर्वी ऑस्ट्रेलिया, अंटाक्र्टिक व भारतीय भूपट्ट कोठे होते त्यांचे स्थान संशोधकांनी निश्चित केले आहे. रॉयल हॅलोवे, ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी व ऑस्ट्रेलियातील जिओसायन्स या संस्थाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे.
पृथ्वीवर असलेले खंड व महासागर यांच्या खाली पृथ्वीवरील जे आवरण आहे त्याला भूपट्ट असे म्हटले जाते व हे भूपट्ट सतत सरकत असतात. पृथ्वीवर सध्या अस्तित्वात असलेले खंड यापूर्वी कोणत्या ठिकाणी होते याबाबत अनिश्चितता होती. या खंडांच्या व महासागराच्या खाली असलेल्या भूपट्टांची सातत्याने हालचाल होत असते. लाखो वर्षापासून ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे प्राचीन काळी हे खंड कोणत्या ठिकाणी होते याचे अचूक नकाशे तयार करता येत नव्हते.
त्यामुळे या संशोधकांनी एक संगणकीय कार्यक्रम तयार करून ऑस्ट्रेलिया, भारत व अंटाक्र्टिका यांचे नकाशे तयार करून त्यांच्या हालचाली एका विशिष्ट काळानुसार कशा होत गेल्या त्यानुसार गोंडवन या महाखंडाच्या तुकडय़ांचे एखाद्या ‘जिगसॉ’ कोडय़ासारखे कोडे तयार केले. हे तुकडे एका ठिकाणांहून दुस-या ठिकाणी सरकवण्याची प्रक्रिया करत असताना यापूर्वी हे भूपट्ट चुकीच्या ठिकाणी ठेवण्यात आले असल्याचे लक्षात आले. प्रत्येक भूपट्टाशी भूशास्त्रीय परिमाणे जुळत नसल्याचे दिसून आले.
खंड आणि भूपट्ट यांच्या सरकण्या संदर्भात जुन्या काळातील संशोधकांनी जे सिद्धांत मांडले होते त्या तंत्राचा वापर या संशोधकांनी केला. या सिद्धांतांकडे अनेक आधुनिक संशोधकांनी दुर्लक्ष केले होते.
हे तंत्र अतिशय साधे असून त्यानुसार प्रत्येक भूपट्टावरील भूशास्त्रीय सीमांची एकमेकांशी जुळणी करून पाहण्यात आले. हे खंड एकमेकांपासून वेगळे होण्यापूर्वी त्यांची परिमाणे काय होती त्यांचा विचार करण्यात आला. त्याच्या जागांचा विचार करून हे तुकडे एकमेकांना जोडल्यावर हे कोडे सुटण्यास मदत झाली.लाखो वर्षापूर्वी या भूपट्टांचे अस्तित्व होते व ते कशा प्रकारे तुटून वेगवेगळे प्रदेश तयार याची माहिती अतिशय महत्त्वाची आहे. याच माहितीच्या आधारे तेलाचे आणि वायूचे मोठे साठे कोठे आहेत ते निश्चित करण्यास मदत मिळते. ऑस्ट्रेलियामध्ये याच माहितीच्या आधारे असे साठे सापडले आहेत, याकडे शास्त्रज्ञांनी लक्ष वेधले आहे.
लोकसत्ता मध्ये गोंडवाना बाबत काही महिन्यापूर्वी लेख आलं होता. तरी तो कृपया मिळेल का, उपलब्ध असल्यास मला पाठवावा ही नम्र विनंती. किंवा अन्य माहिती असल्यास उपलब्ध करावी ही नम्र विंनती.