विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू करण्यात येणार आहे.
पंढरपूर- विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी दिली.
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक संत तुकाराम भवन येथे झाली, त्यावेळी डांगे बोलत होते. ऑनलाइन दर्शनाचा उपक्रम पहिल्यांदा पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूरसह कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यात केला जाणार आहे. या जिल्ह्यांमधील ८२ सेतू कार्यालयांमध्ये भाविकांना ऑनलाइन दर्शन पास मिळेल. या ऑनलाइन दर्शन पासावर भाविकांना दर्शनाची तारीख व वेळ दिली जाईल. त्यामुळे भाविकांचा वेळ वाचेल, असे डांगे म्हणाले.
भीमा नदीच्या किना-यावरील नगर परिषदेच्या ६५ एकर जागेवर संत पीठासह भाविकांना राहण्यासाठी भक्तनिवास व अन्य सोयी-सुविधा देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. राज्यात मंदिराच्या नावे असलेल्या शेत जमिनी परत घेण्यासाठी किंवा त्याबाबत तडजोड करण्याचा निर्णय घेण्यासाठी निवृत्त तहसीलदाराची नियुक्ती मंदिर समिती करणार असल्याचे डांगे यांनी सांगितले. या बैठकीला विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, प्रांताधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्यासह मंदिर समितीचे सदस्य बाळासाहेब बडवे, वसंत पाटील, जयंत भंडारे, वा.ना. उत्पात आदी उपस्थित होते.
[poll id=”69″]
‘भाविकांना चांगल्या सुविधा द्या’
कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून किंबहुना देशभरातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात. या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याबाबत अधिकारी-कर्मचा-यांनी दक्ष राहावे, असे निर्देश विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिले. भाविकांना आरोग्याच्या सुविधा कमी पडणार नाहीत, याकडेही संबंधितांनी लक्ष द्यावे अशी सूचना केली. या वेळी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, आमदार भारत भालके, नगराध्यक्षा उज्ज्वला भालेराव, प्रांताधिकारी बाबासाहेब बेलदार, नगर परिषद मुख्याधिकारी रवींद्र जाधव, तहसीलदार सचिन डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम उपस्थित होते.
Good News..