वाकोला परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईत एका फेरीवाल्याचा मृत्यू झाल्याने वाकोला विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) वसंत ढोबळे यांची शनिवारी तडकाफडकी बदली करण्यात आली.
मुंबई- वाकोला परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईत एका फेरीवाल्याचा मृत्यू झाल्याने वाकोला विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) वसंत ढोबळे यांची गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी तडकाफडकी बदली केली. मुंबई उपनगरात उशिरापर्यंत सुरू असणा-या बार व हुक्कापार्लरविरोधात कडक कारवाई सुरू केल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांची वाकोला येथे बदली करण्यात आली होती.
वाकोला परिसरात जवाहरलाल नेहरू मार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या कामात अडथळ आणणा-या फरीवाल्यांवर ढोबळे यांनी शुक्रवारी कारवाई केली. या वेळी मदन जैस्वाल या फळविक्रेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील संतप्त रहिवाशांनी वाकोला पोलिस ठाण्याला घेराव घातला, तर पोलिसांच्या लाठीमारात जैस्वाल यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ढोबळे यांची वाकोला परिसरातून दक्षिण मुंबईतील पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेली आहे. दरम्यान, डॉक्टरांनी जैस्वाल यांचा शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांकडे दिला असून, त्यांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन हॅमरेजमुळे झाला आहे. मात्र त्यांच्या शरीरावर जखमांच्या कोणत्याही खुणा नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.
ति.रा.रा.आबांस,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
विनंती वजा विशेष म्हणजे, ’सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत ढोबळे यांच्या कारवाईला अखेर आर.आर.पाटील यांनी वेसण घातली’ ही बातमी वाचली, आणी तुम्हाला सांगतो मी खरच अक्षरश: पडलो, पडलो म्हणजे बुचकुळ्यात म्हणतात ना तसां! हे पेपरवाले पण नं, काहीही लिहतात, म्हणे तुम्ही ’वेसण घातली’, वेसण घालायला तो काय बैल, रेडा की वळू! ते जाऊ दे!
मला जरा कुणी सांगाल का कोण आहेत हे सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत ढोबळे ?
सिनेमात दाखवतात तसे लाच खाणारा, की दारू पिऊन, नशापाणी करुन मदमस्त, उन्मत्तपणे वावरणारा पोलिस अधिकारी ? की बजबजपुरी झालेल्या मुंबईत गल्लोगल्ली, नाक्यावर सापडणारा मटका/लॉटरी की विडीओ पार्लर चालवणारा एखादा दादा की भाई ?
सत्यपालसिंगानी पदभार स्विकारल्यावर लगेच नको तेवढी तत्परता दाखवत सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत ढोबळे ह्याची बदली केली, का तर अनधिकृत हुक्का पार्लर बंद पाडले, नंतर काय तर अनधिकृत बार बंद केले आणि हे सर्व करताना त्यांनी हॉकीस्टीक्सचा वापर केला म्हणून. खर तर आपल्या देशाचे दुर्दैव की आपले सत्ताधारी, मग ते महानगरपालिकेतील असो की राज्य सरकारातील असो, आपल्या डोळ्यादेखत अनेक अनधिकृत कामे होत असताना ’फक्त मतांच्या’ राजकारणासाठी स्वत: झापडं लावून बसतात आणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ह्या गोष्टींना साथ देतात.
काही दिवसांपूर्वी एका मंत्र्य़ानी एक शोध लावला की, रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले कारण लोक रस्तांवर चालतात आणी वाहनांचा धक्का लागून अपघात होतात, ते जे काही म्हणाले ते अगदी खरं आहे, आज मुंबई शहराचेच उदाहरण द्यायचे झाले तर माणसांना चालण्यासाठी कुठे आहेत पदपथ. सर्व ठिकाणी पदपथ राहिलेच कुठे? कुणीही मुंबईत यावे पदपथावर बिनदिक्कत आपल्या घटनेचा दाखला द्यावा आणी पथारी मांडावी, बाकडा, टपरी लावावी आणी सर्रास उद्योग चालू करावा आणी तो पण कसा, तर आपल्या महानगरपालिका, पोलीसांच्या नियमाविरुध्द, अगदी सगळ्यांच्या नाकावर टिच्चून. ह्याला कारण आपलेच लाचखावू अधिकारी आणी निल्ल्ज्जपणे समाजकारण करणारे लाचखावू राजकारणी. आपल्या आजूबाजूला पसरलेल्या अनधिकृत उद्योगधंद्यांवर कारवाई कोण करतो किंवा किती झाल्या हा संशोधनाचा विषय होईल किंवा माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून ते बाहेर येईलच.
ह्या सर्वांवर कोणी अंकुश ठेवायचा ? अनधिकृत पार्लर, बार, दुकाने, पद्पथ नाहीसा करणारे फेरीवाले ह्यांच्या विरुध्द ढोबळे यांच्या ‘ हॉकीस्टिक ‘ कारवाईला विरोध का? तडकाफडकी बदली! जसे काय स्वत: ढोबळेनी ’हॉकीस्टिक’नी त्या फेरीवाल्याला मारहाण केली आणी मारहाण केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. खर तर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करायला महानगरपालिकेचे अधिकारी जातात आणी त्या अधिका-य़ांना संरक्षण देण्यासाठी पोलिस असतात, श्री.वसंत ढोबळे ह्यांच्या सारखा एक कर्तव्यतत्पर, द्क्ष अधिकारी स्वत: ह्या पालिका अधिका-य़ांबरोबर आहेत हे महानगरपालिकेच्या अधिका-यांचे मनोबल वाढवणारीच गोष्ट आहे, त्यामुळेच पालिका अधिकारी सांताकृझ, वाकोला आणी विलेपार्ले येथे अतिशय निर्भयपणे, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करू शकले. सांताकृझ येथे प्रवास करणारे सांगू शकतील, गेली किती दशके सांताकृझ रेल्वे पुलावरील अनधिकृत फेरीवाले तिथे ठाण मांडून आहेत, त्या फेरीवाल्यांची बहूदा तिसरी अथवा चौथी पिढी चालू असेल. असो!
श्री.ढोबळे यांच्या उपस्थितीत वाकोला भागात फेरिवाल्यांवर महनगरपालिका अधिका-यांनी केलेल्या कारवाईत एका फेरीवाल्याचा मृत्यूस, आपण म्हणजे ति.रा.रा.आबांनी श्री.वसंत ढोबळे ह्यांच्या सारखा एक कर्तव्यतत्पर, द्क्ष अधिका-याची कशाच्या आधारे (कुणा दत्त, कृपा मुळे) त्यांची तडकाफडकी बदली केली आहे ह्याचे उत्तर जनतेस द्यावे ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
एक सांताकृझवासी