रस्त्यांवरील गुन्ह्यांना लगाम घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी ब्लूफिल्म दाखवणा-या व्हिडिओ पार्लरविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे.
मुंबई – रस्त्यांवरील गुन्ह्यांना लगाम घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी ब्लूफिल्म दाखवणा-या व्हिडिओ पार्लरविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. तीन महिने चालणा-या या मोहिमेत अंमली पदार्थाविरोधात विशेष मोहीम सुरू ठेवणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी नुकतीच दिली.
शहरातील काही ठिकाणी व्हिडिओ पार्लरच्या नावाखाली ब्लूफिल्म दाखवण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे बलात्कार, विनयभंग तसेच छेडछाडीच्या प्रकारांना उत्तेजन मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी ब्लू फिल्म दाखवणा-या पार्लरविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. नोव्हेंबरपासून जानेवारीपर्यंत तीन महिने ही मोहीम चालणार आहे. त्याचप्रमाणे मोबाइलमध्ये ब्लूफिल्म भरून देणा-या दुकानांवरही कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. २ फेब्रुवारीपासून मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ सेवन व विक्रेत्यांविरोधात सुरू केलेली मोहीम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचेही मारिया यांनी स्पष्ट केले.
२०१३ रोजी अंमली पदार्थाप्रकरणात एक हजार २७१ गुन्ह्यांत मुंबई पोलिसांनी तीन हजार ९४१ जणांना अटक केली होती. यंदा २ फेब्रवारीपासून सुरू अंमली पदार्थ विरोधातील विशेष मोहिमेत ४ नोव्हेंबपर्यंत ९ हजार ५५८ गुन्ह्यांत १२ हजार २७५ जणांना अटक केली आहे.
बेपत्ता मुलांच्या शोधासाठी विशेष पथक
मुंबईत मागील दहा वर्षात बेपत्ता झालेल्या मुलांना शोधण्यासाठी मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यात एक विशेष पथक नेमण्याचे ठरवले आहे. या पथकात किमान एक अधिकारी व तीन ते चार कर्मचारी ठेवण्यात येतील. हे पथक फक्त १८ वर्षाखालील बेपत्ता मुलांना शोधण्याचे काम करणार आहे. त्यासाठी त्यांना मागील दहा वर्षात पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या मुलांची माहिती काढण्यास सांगण्यात आली आहे. हे पथक थेट पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंतर्गत काम करणार असून मुले चोरी करणा-या टोळीला पकडल्यास १० हजार व सव्र्हिस बुकमध्ये त्याची नोंद आणि बेपत्ता मुलाचा शोध घेतल्यास पाच हजार व सव्र्हिस बुकमध्ये नोंद असे, पारितोषिकही पोलिस आयुक्तांकडून देण्यात येणार आहे. दर महिन्याला याचा आढावा घेण्यात येणार आहे. या संदर्भात पोलिस आयुक्तांनी नुकतीच बैठक घेतली असून त्यात बेपत्ता मुलांचा शोध कसा घ्यायचा, याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
मुंबईत काही पोलिस चौकीत जिथे तक्रार नोंदविली जाते तेथेच केबल टि वि लावून पोलिस चौकीतील कर्मचारी रात्रपाळीत चित्रपटाचा आणि संगीताचा आनंद लुटताना दिसतात. खरोखर अशाने दक्ष पोलिसांना भरपूर नाहक त्रास मुंबईतील जनतेकडून सहन करावा लागतो. रस्त्यावरील गुन्ह्याला खरोखरच लगाम लागला पाहिजे. काही लाचखोर पोलिस कर्मचारी तर चुकीची व्यक्ती पोलिस चौकीत डांबून त्यांच्या नवे पैसे गोळा करून कोणती तरी मोठी कामगिरी केल्याचे सोंग रचतात.