छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी कधीच न उलगडलेल्या बाजू मला जगासमोर आणायच्या आहेत, असा निर्धार ‘डुडल फॉर शिवराया’ ही आगळीवेगळी मोहीम सुरू करणा-या यवतमाळमधील अर्णी गावातील तरुण अमित वानखडे पाटील याने व्यक्त केला.
मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी दिलेल्या लढय़ाविषयी प्रत्येकाला नितांत आदर आहे. शिवरायांबाबत मनात असलेला हा आदर व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत मात्र वेगळी आहे. शिवाजींचे जीवन, त्यांचे कार्य हे पाठय़पुस्तकातून, इंटरनेटद्वारे वाचायला मिळते. पण शिवरायांच्या आयुष्यातील असेही काही क्षण आहेत जे अजूनही जगासमोर आलेले नाहीत. त्यांच्या जीवनाविषयी कधीच न उलगडलेल्या बाजू मला जगासमोर आणायच्या आहेत, असा निर्धार ‘डुडल फॉर शिवराया’ ही आगळीवेगळी मोहीम सुरू करणा-या यवतमाळमधील अर्णी गावातील तरुण अमित वानखडे पाटील याने व्यक्त केला.
१९ फेब्रुवारी रोजी असणा-या शिवजयंतीनिमित्त शिवरायांना मानाचा मुजरा देण्यासाठी या वर्षी ‘गुगल’ या सर्च इंजिनने त्यांच्या होमपेजवर शिवरायांचे ‘डुडल’ बनवावे ही जिद्द मनाशी बाळगत अमितने ‘डुडल फॉर शिवराया’ ही मोहीम सुरू केली असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहेच. पण सोबत ही अनोखी मोहीम सुरू करणा-या तरुणाविषयी ठिकठिकाणी चर्चा सुरू आहे.
शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू आहेच. पण व्हॉटसअॅप, टिवटर, फेसबुकवरून एकाच गोष्टीबाबत चर्चा होत आहे आणि ती म्हणजे ‘डुडल फॉर शिवराया’ ही ऑनलाईन मोहीम. ही मोहीम अमित या २९ वर्षीय तरुणाने सुरू केली आहे. अमित मूळचा यवतमाळमधील अर्णी या गावातील आहे. अमित शेतीव्यवसाय करतोच, सोबत पेशाने जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या शाळेत सर्वच विषय अमित शिकवतो मात्र त्याचा आवडीचा विषय इंग्रजी आहे. शेती करताना, शिक्षक म्हणून कार्यरत असताना शिवरायांबाबत मनात नितांत आदर कसा निर्माण झाला आणि त्यांच्यासाठी अनोखी मोहीम सुरू करण्याबाबत अमितला विचारले असता तो म्हणाला की, महाराष्ट्रात राहणा-या प्रत्येक भूमिपूत्राच्या मनात शिवरायांबाबत आदर असतोच यात दुमत नाही. शिवारायांबाबत, त्यांच्या लढय़ाविषयी मला जसजसे कळत गेले तसतसा त्यांच्या प्रती असलेला आदर अजून वाढत गेला.
आपल्या या आदर्शाला जयंतीनिमित्त अनोखा मुजरा द्यावा यासाठी गेल्या वर्षीपासून अमित ‘डुडल फॉर शिवराय’ ही मोहीम चालवत आहे. मात्र अपेक्षित तसा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली. देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या मोठी आहे. तसेच ‘गुगल’ या सर्च इंजिनला भेट देणा-यांची संख्या कोटय़वधींमध्ये आहे. गुगलद्वारे बनवण्यात आलेल्या ‘डुडल’ची दखल प्रत्येकाद्वारे घेतली जाते शिवाय केवळ एका क्लीकवर ही माहिती सर्वत्र पोहोचते. त्यामुळे शिवरायांवर आधारित एक डुडल बनवावे यासाठी मी गेल्या वर्षीपासून प्रयत्नशील आहे.
या वर्षी ६ फेब्रुवारीपासून मी ही मोहीम सुरू केली आणि अवघ्या काही दिवसात २७ हजारहून अधिक जणांनी शिवरायांचे ‘डुडल’ बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन याचिकेला समर्थन दर्शवले. पण हा आकडा याचिकेसाठी बनवलेल्या संकेतस्थळाला भेट देणा-या आकडय़ापेक्षा फार कमी आहे. जवळपास ८० हजारहून अधिक जणांनी संकेतस्थळाला भेट दिली आहे. याचिका दाखल कशी करावी याबाबत कळत नसल्याचे अनेक फोनही मला आले. पण प्रत्येकाने आपले प्रयत्न चालू ठेवावे आणि लाखोंच्या संख्येने प्रतिसाद देत ही मोहीम यशस्वी करावी, अशी भावना अमितने व्यक्त केली.
शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास जगातील सर्वाना माहित आहे.पण माहित नाही मराठी माणसाना.कारण सत्य समजून घेण्याची कुवत मराठी माणसात नाही.