सिंधुदुर्ग जिल्हय़ातील बेकायदेशीर वाळू वाहतुकीमध्ये सिंधुदुर्ग पोलीस कसे गुंतले आहेत हे कुडाळ पोलीस स्टेशनचे हेड कॉ. विजय तांबे यांना ३ हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली यावरून निदर्शनास येते.
सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्हय़ातील बेकायदेशीर वाळू वाहतुकीमध्ये सिंधुदुर्ग पोलीस कसे गुंतले आहेत हे कुडाळ पोलीस स्टेशनचे हेड कॉ. विजय तांबे यांना ३ हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली यावरून निदर्शनास येते. हेड कॉ. तांबे यांना पोलीस कस्टडीही मिळाली आहे.
मात्र कॉ. तांबे यांना लाच घेताना पकडल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस दलात ‘हप्तेबाजी’ कशी सुरू आहे याचा पर्दापाश झाला आहे. कॉ. तांबेचे निलंबन झाले. परंतु ज्यांच्यासाठी कॉ. तांबे हप्ते वसुली करतो त्यांचे काय? कोणाकोणापर्यंत हा तीन हजारांचा हप्ता पोच होतो.
एका डंपर मागे आठवडय़ाला तीन हजार तर सुमारे ५०० डंपरचे तीन हजारप्रमाणे किती लाख होतात हे घेणाऱ्यांनाच माहीत. ही केवळ बेकायदा वाळू वाहतूक करणारे आणि पोलीस यांच्यातील ‘समझोत्या’ची झलक आहे.
दोन महिन्यांपूर्वी वेंगुर्ले पोलीस स्टेशनचा पोलीस कॉन्स्टेबल पाटील यालाही पासपोर्टचे कागदपत्र देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले. कॉ. तांबे व कॉ. पाटील यांनी मागितलेली लाच स्वत:साठी मागितलेली नाही.
ज्यांच्या आदेशाने ही लाच मागितली त्यांच्यावर कोण कारवाई करणार? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. राष्ट्रपती पदकप्राप्त जिल्हय़ाचे पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांच्या पोलीस दलातील पोलीस लाच घेताना पकडले जातात. याचेच आश्चर्य वाटत असल्याची लोकांमध्ये चर्चा आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात वाळू तस्करी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू आहे. जिल्हय़ात आणि गोवा राज्यात दररोज ५०० डंपर वाळू वाहतूक करतात.
बेकायदेशीर वाळू वाहतुकीसाठी एका डंपरमागे आठवडय़ासाठी ३ हजार रुपये हप्ता दिला जातो. हे सर्व राजरोसपणे सुरू आहे. बेकायदा वाळू वाहतूक कशा रितीने चालते हे महामार्गावर पहावयास मिळते.
मुंबई कमिशनर यांनी मध्यंतरी लाचलुचपत संबंधी एक परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये ज्या पोलीस स्टेशनचा पोलीस लाच घेताना पकडला जाईल, त्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावरही कारवाई करण्याचे त्या आदेशात नमूद करण्यात आले होते.
सिंधुदुर्ग पोलीस दलातील ही लाचखोरी रोखण्यासाठी ज्या पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी लाचखोरी केली, त्या पोलीस निरीक्षकांवर कारवाईची शिफारस वरिष्ठांकडे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर करणार काय? की कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई आणि वरिष्ठांना अभय दिले जाणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
औरंगाबाद येथे लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचे अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांना लाचलुचपत विभागाचा चांगलाच अनुभव आहे. यामुळे जिल्हय़ातील पोलीस दलाला लागलेले लाचखोरीचे ‘ग्रहण’ पोलीस अधीक्षकांच्या अनुभवी नजरेतून सुटेल, अशी अपेक्षा जिल्हय़ातील जनता करत आहे.
ky चाललाय हे आमच्या कुडाळ मध्ये !!!!????