मरणोत्तर अवयवदान केल्यानंतर दात्याच्या कुटुंबाची काळजी घेणे संबंधित खासगी रुग्णालयांना बंधनकारक करणारा नवा कायदा करण्यासाठी राज्य सरकार विचार करत आहे.
मुंबई- मरणोत्तर अवयवदान केल्यानंतर दात्याच्या कुटुंबाची काळजी घेणे संबंधित खासगी रुग्णालयांना बंधनकारक करणारा नवा कायदा करण्यासाठी राज्य सरकार विचार करत आहे. लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी येथे दिली.
अवयवदानासंदर्भात जनजागृती निर्माण व्हावी व दात्यांची संख्या वाढावी यासाठी येत्या ३० ऑगस्टपासून महाअवयवदान अभियान राबवणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केली.
गुरुवारी मंत्रालयात या महाअभियानाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन आरोग्य मंत्री दीपक सावंत आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. सध्या असलेले कायदे केंद्राचे आहेत. ते अधिक कडक करण्यासाठी राज्य सरकार केंद्राला विनंती करणार आहे.
अवयवदानाला प्रोत्साहन मिळावे म्हणून दात्याच्या कुटुंबीयांना संबंधित खासगी रुग्णालयाने वैद्यकीय सेवा पुरवावी, अशी तरतूद असणारा कायदा राज्य सरकार तयार करत आहेत. त्यावर सध्या विचारविनिमय सुरू आहे. लवकरच त्यांची घोषणा करण्यात येईल, असे आरोग्य मंत्री सावंत यांनी सांगितले.
मात्र, राज्यातील कोणत्या कायद्याचा आधार घेत हा नवा कायदा करणार असल्याचे सावंत यांना विचारले असता, त्यांनी त्याचे उत्तर दिले नाही. खासगी रुग्णालयात अवयवदान करताना शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च एकसमान ठेवणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आजवर ११ हजार ३६४ किडनी, ४६८ लिव्हर, १९ हृदय व ३ फुप्फुसांचे तसेच ४७९ डोळे प्रत्यारोपण करण्यात आले आहे.
मात्र अजूनही ५ लाख मूत्रपिंड, ५० हजार यकृत व २ हजारहून अधिक गंभीर हृदयविकारांनी ग्रस्त रुग्ण आहेत. ते अवयवदात्यांच्या प्रतीक्षेत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने दात्यांची संख्या वाढवण्यासाठी येत्या ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर, २०१६ कालावधीत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ऑनलाईन अवयवदान नोंदणी करीत वेब-लिंक प्रथमच सुरू करण्यात आली आहे.
जनतेने त्यात सहभाग घेऊन ऑनलाईन अर्जाची नोंदणी करावी आणि प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना अवयवदान करून नवे जीवनदान द्यावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
Give Prefrance to medial Social Workers And Patient Care exe. first for organ s Donors Movement.
Thanks
sagar
patient care exe.
medical social worker