मेट्रो आणि मोनो मुंबईकरांच्या सेवेत असली तरी ‘लोकलयातना’ कमी नाहीत. त्या कमी करण्यासाठी बम्बार्डियर लोकलचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार असून रेल्वे मंत्रालयानेही त्यासाठी हिरवा बावटा दाखवला आहे.
मुंबई – मेट्रो आणि मोनो मुंबईकरांच्या सेवेत असली तरी ‘लोकलयातना’ कमी नाहीत. त्या कमी करण्यासाठी बम्बार्डियर लोकलचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार असून रेल्वे मंत्रालयानेही त्यासाठी हिरवा बावटा दाखवला आहे. येत्या महिनाभरात बम्बार्डियर पश्चिम रेल्वे मार्गावर धावताना दिसतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे सचिव विनित कुमार यांनी ‘प्रहार’ला दिली.
[poll id=”922″]
यापूर्वी पश्चिम रेल्वे मार्गावर बम्बार्डियरची चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी फलाटांच्या उंचीमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. भारतीय रेल्वेच्या निकषांनुसार गाडय़ांची रुंदी १०.५ फूट इतकी असते. लांब पल्ल्यांच्या गाडय़ांचा डब्बा याच निकषानुसारच तयार होतो. मात्र उपनगरीय गाडय़ांच्या डब्यांची रचना वेगळी या गाडय़ांची रुंदी १२ फूट इतकी असते.
सिमेन्स कंपनीच्या गाडय़ांची रुंदीही १२ फूट असते. त्यामुळे हेच सवलत प्रमाणपत्र बम्बार्डियरसाठी घेण्याची गरज भासली होती, असे विनित कुमार यांनी सांगितले. मात्र आता रेल्वे बोर्डाने ग्रीन सिग्नल दाखवल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवास आरामदायी होणार आहे.
मध्य रेल्वेच्या मार्गावर डीसी-एसी परिवर्तनाचे काम पूर्ण झाले असले तरीही रेल्वे बोर्डाकडून त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. मात्र येत्या वर्षभरात मध्य रेल्वेवरही बम्बार्डियर लोकल धावणे अपेक्षित आहे. बम्बार्डियरसाठी नोव्हेंबर २०११ मध्ये करार करण्यात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१३ मध्ये या लोकलची झलक दाखवण्यात आली.
त्यानुसार रेल्वे अर्थसंकल्पात ७२ बम्बार्डियर लोकलसाठी मंजुरीही देण्यात आली होती. यातील ३८ गाडय़ा मध्य रेल्वेसाठी तर ३४ पश्चिम रेल्वेला देण्यात आल्या होत्या. जर्मन बनावटीच्या या लोकलची बांधणी चेन्नईतील इंटिग्रल कोच कारखान्यात सुरू होती.
प्रत्येक बम्बार्डियरसाठी अंदाजे ३० कोटी रुपये खर्च झाला असून बांधणीसाठी अंदाजे ३ हजार कोटी खर्च अपेक्षित होता. मात्र सध्या केवळ दोनच बम्बार्डियर पश्चिम रेल्वेवर दाखल झाल्या असून टप्प्या-टप्प्याने मध्य व पश्चिम मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
दोन्ही मार्गावर
पश्चिम रेल्वेवर दोन बंम्बार्डियर लोकल धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील सिमेन्स कंपनीच्या दोन लोकल मध्य रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होऊ शकतात. सध्या मध्य रेल्वेवर रेट्रो कंपनीच्या जुन्या गाडय़ा आहेत. या गाडय़ांचे पार्ट्सही उपलब्ध होणे कठीण झाले आहे. पश्चिम रेल्वेवरील दोन सिमेन्स आणि नव्याने येणा-या बम्बार्डियर मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्यास प्रवास सुखदायी होईल.
काय असतील सेवा-सुविधा
नवीन बम्बार्डियरच्या दोन आसनांत मोकळी जागा असेल. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासात अडचणी येणार नाहीत
४०० प्रवाशांना वाहून नेण्याची आसनक्षमता
दरवाजावरील खांबाच्या रचनेतही बदल
कोंदट हवा बाहेर फेकण्यासाठी व्हेंटिलेटर
नवीन खिडक्यांची उंची वाढवली
उभ्या प्रवाशांसाठी फायबरचे हँडल
मुंबईची लोकल पकडायची आणि ज्यांना नालासोपारा ते चर्चगेटपर्यंत जायचे असते, त्याकरिता नालासोपारा येथे राहणाऱ्या व्यक्तीस किमान २ तास आधी घरातून निघावे लागते.कारण उलट प्रवास करणारी व्यक्ती किमान वसई, नायगावपासूनच लोकलमधील सीट अडवून बसतात. म्हणजेच प्रथम दर्जाच्या व्यक्तीहि असा प्रवास करू शकत नाही. अशावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बंबार्डियर लोकलमध्ये सीट बसवूच नये त्यामुळे किमान १२ फुटाच्या रेल्वेत जवळजवळ ५००प्रवाशी तरी अतिरिक्त प्रवास करू शकतील. कारण सीट रिकामी असूनही जागा अडवणाऱ्या व्यक्ती त्या सीटवर बसण्यास देत नाही,म्हणजे ज्या व्यक्तीला सीट रिकामी दिसतात आणि तो त्या सीटवर बसू शकत नाही,याचा अर्थ तो फुक्कट प्रवाशी असणार.नाहीतरी अशा सीट अडवणाऱ्या व्यक्तीस रेल्वे पोलिस का अटक करू शकते का? तर नाही. कारण त्यांचा ग्रुप फार मोठ्या प्रमाणात असतो आणि सर्व सामान्य माणूस त्यांच्याशी मारामारी करूच शकत नाही.जसे १ हवालदार ५००लोकांच्या जनसमुदायावर नियंत्रण करू शकत नाही, त्याचप्रमाणे १ व्यक्ती ५० जणांच्या ग्रुपला कसा मारेल? नाहीतरी आतापर्यंत विरार पर्यंतचा फक्त ४० टक्के विकास झाला आहे, उर्वरित ६० टक्के जागेत जर किमान २ वर्षांनी आणखी कित्येक टोवर आणि उंचच उंच इमारती उभ्या राहतील, तेव्हा तेथील जनता प्रवास करण्यास निघतील त्या सर्व जनसमुदायाकरिता का एवढी छोटी बंबार्डियर सर्व प्रवाशांकरिता सोयीस्कर आहे का? तसेच मुंबई हि तुमची, आमची आणि सर्व राज्यातील व्यक्तींची आहे, त्यामुळे कोणीही येथे वास्तव्य करून राहू शकतो? ह्या सर्व बाबी लक्षात घेता मुख्यमंत्री साहेबांनी बंबार्डियर लोकलमध्ये सीट बसवू नये. धन्यवाद.