बंगळूरु- माजी विजेता मुंबई इंडियन्सनी बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सला चार विकेटनी हरवत आयपीएलच्या दहाव्या हंगामात सलग तिस-या विजयाची नोंद केली.
यंदाच्या मोसमात विजयी हॅटट्रिक साधणारा मुंबई पहिलाच संघ आहे. मधल्या फळीतील किरॉन पोलार्ड (४७ चेंडूंत ७० धावा) त्यांच्या मदतीला धावला. मात्र त्याच्या फटकेबाजीमुळे लेगस्पिनर सॅम्युअल बद्रीची हॅट्ट्रिक व्यर्थ ठरली.
गोलंदाजांनी गाजवलेल्या लढतीत शुक्रवारी मुंबईने यजमानांचे १४३ धावांचे आव्हान ६ विकेटच्या बदल्यात १८.५ षटकांत पार केले. मधल्या फळीतील पोलार्डने ४७ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ७० धावांची ‘मॅचविनिंग’ खेळी केली. त्याला अष्टपैलू कृणाल पंडय़ाची (नाबाद ३७) सुरेख साथ लाभली. पोलार्ड आणि कृणालच्या फटकेबाजीमुळे सॅम्युअल बद्रीच्या (४-१-९-४) अप्रतिम ‘स्पेल’वर पाणी फेरले गेले.
पोलार्डला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून मुंबईने बंगळूरुला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यांनीही अचूक आणि प्रभावी गोलंदाजी करताना यजमानांना ५ बाद १४२ धावांत रोखले. कर्णधार विराट कोहलीने (४७ चेंडूंत ६२ धावा) यंदाच्या हंगामाची धडाकेबाज सुरुवात केली तरी अन्य फलंदाजांना झटपट धावा करणे, जमले नाही. खांद्याच्या दुखापतीतून सावरलेल्या विराटने ख्रिस गेलसह (२२) संयमी ६३ धावांची सलामी दिली. मात्र मजबूत पायाभरणीनंतरही यजमानांना दीडशेपार जाता आले नाही.
संक्षिप्त धावफलक
बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स – ५ बाद १४२ (कोहली ६२, मॅकक्लेनॅघन २०-२)
मुंबई इंडियन्स – १८.५ षटकांत ६ बाद १४५ (पोलार्ड ७०, कृणाल पंडय़ा नाबाद ३७).
निकाल : मुंबई ४ विकेटनी विजयी.
सामनावीर : किरॉन पोलार्ड.
चांगली बायटिंग केली किरॉन पोलार्ड याने, रोहित शर्माचा फॉर्म येण्याची गरज नाही कारण बाकी सर्व चांगले खेळात आहेत नाहीतर तो फॉर्म मध्ये यायचा आणि बाकी सर्वांचा फॉर्म जायचा . ओके पण टीम चांगली खेळात आहे .