ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांनी मंगळवारी नव्वदीत पदार्पण केले. त्यांना प्रहार परिवारातर्फे शुभेच्छा.
मुंबई – अभिनयाचे विद्यापीठ समजले जाणारे बुजुर्ग अभिनेते युसूफखान सरवरखान पठाण ऊर्फ दिलीपकुमार मंगळवारी ९१व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. वयाची नव्वद वर्षे पूर्ण करत असल्यानिमित्त त्यांची पत्नी सायराबानू जंगी पार्टीचे आयोजन करणार असल्याची चर्चा होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये आधी यश चोप्रा आणि मग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन निकटवर्तीयांचे निधन झाल्यामुळे दिलीपकुमार साधेपणानेच वाढदिवस साजरा करणार आहेत.
बाँम्बे टॉकीजच्या ‘ज्वार भाटा’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणा-या दिलीपकुमारने केवळ अभिनयाचा बाजच नव्हे, तर चित्रपटसृष्टीतले अनेक नियमही बदलले. एका वेळेस एक किंवा दोनच चित्रपट करण्याची प्रथा दिलीपकुमार यांनी सुरू केली. त्याचप्रमाणे, दिग्दर्शकाला ‘क्रिएटिव्ह सूचना’ देण्याबद्दलही ते मशहूर होते. ‘मेला’, ‘अंदाज’, ‘अमर’, ‘तराना’, ‘उडन खटोला’, ‘दाग’, ‘दीदार’, ‘संगदिल’ यांसारख्या पराभूत प्रेमीच्या व्यक्तिरेखा ५०च्या दशकांत सातत्याने साकारल्यामुळे त्यांच्यावर ‘ट्रॅजडी किंग’ हा शिक्का बसला; मात्र ‘गंगा जमना’, ‘कोहिनूर’, ‘राम और श्याम’, ‘आन’, ‘इन्सानियत’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी अॅक्शन आणि विनोदी भूमिकाही तितक्याच ताकदीने केल्या. आयुष्याच्या उत्तरार्धात ८०च्या दशकात ‘विधाता’, ‘शक्ती’, ‘कर्मा’, ‘मशाल’ आणि ‘सौदागर’सारख्या चित्रपटांमधून त्यांनी कथेच्या केंद्रस्थानी असलेल्या चरित्र भूमिकांमधूनही अभिनयाचा वेगळा बाज दाखवला.
आज पाली हिलवरील आपल्या बंगल्यात अभिनेत्री पत्नी सायराबानू हिच्यासह निवृत्त आयुष्य समाधानाने जगणाऱ्या या श्रेष्ठ कलावंतास भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वोच्च समजला जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याखेरीज केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’नेही सन्मानीत केले आहे. पाकिस्तानतर्फे दिला जाणारा ‘निशान-ए-इम्तियाझ’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कारगिल युद्धानंतरही परत न करण्याच्या त्यांच्या कृतीमुळे काही काळ असंतोष निर्माण झाला होता. मात्र, भारतीय चाहत्यांचे त्यांच्यावरील प्रेम कमी झाले नाही.
दिलीप कुमार यांच्या देवदास चित्रपटाची झलक पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा.
दिलीप कुमार यांना तुम्हीही शुभेच्छा द्या…शुभेच्छा देण्यासाठी खाली दिलेल्या बॉक्समध्ये कमेंट करा…
वाढदिवसाच्या शुभेच्छा…