आर्थिक बळ वाढावे यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसच्या तिकिटात केलेली दरवाढ बेस्टच्या आर्थिक मुळावर उठली आहे.
मुंबई- आर्थिक बळ वाढावे यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसच्या तिकिटात केलेली दरवाढ बेस्टच्या आर्थिक मुळावर उठली आहे. १ एप्रिलपूर्वी बेस्टच्या दैनंदिन तिकिटाचा ४० रुपये असलेला दर आता ७० रुपये झाल्याने प्रवाशांनी बेस्टकडे पाठ फिरवली आहे.
फेब्रुवारी व एप्रिल या दोन महिन्यांच्या आत दोन वेळा तिकिटात वाढ केल्याने बेस्टच्या महसुलात वाढ झाली असली तरी प्रत्यक्षात तिकीट विक्रीत घट झाल्याने भविष्यात महसुलीवरही परिणाम होईल, अशी भीती वरिष्ठ अधिका-यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही वर्षापासून बेस्ट परिवहन विभाग तोटय़ात जात आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहनने प्रवाशांना लक्ष्य करत बेस्ट बस तिकीट दरात वाढ केली. ही दरवाढ दोन महिन्यांच्या आत दोन वेळा केल्याने प्रवाशांनी बेस्ट प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन विभागाने प्रथम २५ रुपयांचे दैनंदिन तिकीट सुरू केले होते.
२५ रुपयांच्या दैनंदिन तिकिटाला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत होता. कालातंराने २५ रुपयांचे तिकीट बंद करून ४० रुपयांची दैनंदिन तिकीट योजना अमलात आणली. ४० रुपयांच्या दैनंदिन तिकिटालाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता, मात्र पुन्हा आर्थिक तूट उद्भवल्याने ही दरवाढ ७० रुपयांपर्यंत नेली आहे.
दैनंदिन तिकीट ४० रुपये असताना ६० हजारांहून अधिक प्रवासी याचा वापर करत होते, मात्र १ एप्रिलपासून ४० रुपयांचे दैनंदिन तिकीट ७० रुपये झाले आणि प्रवाशांची संख्याही ३० हजारांवर आली. या तिकीट दरवाढीमुळे बेस्टच्या महसुलात वाढ झाली असली तरी प्रत्यक्षात प्रवाशांची संख्या कमी झाल्याचे समोर आले आहे.
मिडी, सर्वसाधारण, वातानुकूलित, डबल डेकर अशा एकूण ४ हजार २०० बस बेस्टच्या ताफ्यात असून, ३८ लाख प्रवासी बेस्ट बसने प्रवास करतात, परंतु नियोजनाअभावी गेल्या काही वर्षापासून बेस्ट परिवहन तोटय़ात आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी योग्य ते नियोजन न केल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.
This is very costliest bus service for Local and short distance journey. Now a days multiple municipality bus services schedule for same rout and time were BEST is costliest bus service without required minimum passenger.
State Govt take charge of logistics and time table for save fuel .