धावत्या सालेम-चेन्नई एक्स्प्रेसचे छत कापून रिझर्व्ह बँकेच्या कोटयवधी रुपयांवर दरोडा टाकण्याची घटना मंगळवारी घडली.
चेन्नई- धावत्या सालेम-चेन्नई एक्स्प्रेसचे छत कापून रिझर्व्ह बँकेच्या कोटयवधी रुपयांवर दरोडा टाकण्याची घटना मंगळवारी घडली. पैशाच्या तीन पेटया घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केल्याचे आढळले आहे.
सकाळी ९ वाजता सालेमहून चेन्नईला निघालेल्या एक्स्प्रेसला १९ डबे होते. त्यातील तीन डबे सामानाचे होते. त्यात रिझर्व्ह बँकेचे ३२५ कोटी रुपये २२५ लाकडी पेटयांमध्ये ठेवले होते. या नोटांचे वजन २३ टन होते. या सामानाच्या डब्याच्या छताला चोरटयांनी दोन फुटांचे भोक पाडले. त्यातून पैशाच्या तीन पेटया पळवून नेल्या.
चेन्नई रेल्वे स्थानकावर रिझर्व्ह बँकेच्या कर्मचा-यांना सामानाच्या डब्यात आल्यानंतर गाडीवर दरोडा पडल्याचे लक्षात आले. त्यानंतर तपास सुरू झाला.
या घटनेनंतर न्यायवैधक खात्याच्या अधिका-यांनी सामानाच्या डब्याची तपासणी करून काही धागेदोरे मिळतात का याचा तपास केला. विशेष म्हणजे या रेल्वेतून रोख रक्कम नेली जात असल्याने या सामानाच्या पुढील डब्यात पोलिसांची सुरक्षेसाठी नियुक्ती केली होती. धावत्या रेल्वेतून दरोडा टाकण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे पोलीस महानिरीक्षक भास्करन यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, सालेम येथील पाच बँकांतून रिझर्व्ह बँकेने या नोटा गोळा केल्या होत्या. त्या चेन्नईत नेल्या जात होत्या. छत कापण्यासाठी त्यांनी स्टील कटर आणि वेल्डिंग मशीनचा वापर केला. ही एक्स्प्रेस विरुधाचलम येथे रात्रौ १.३० वाजता थांबलेली असताना त्यांनी पोबारा केला असावा असा पोलिसांचा कयास आहे. काही जण सामानाच्या डब्याच्या छतातून बाहेर पडत असल्याचे विरुधाचलम रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्हीमध्ये दिसले.
ह्या चोरटयांनी नक्कीच ” फाईव्ह मॅन आर्मी ” हा सिनेमा पहिला असणार .!