काँग्रेसचे उमेदवार श्री. नारायण राणे यांच्यासह विधानसभेतील विधान परिषदेचे १० च्या १० उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे आज जाहीर केले.
मुंबई- काँग्रेसचे उमेदवार श्री. नारायण राणे यांच्यासह विधानसभेतील विधान परिषदेचे १० च्या १० उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे आज जाहीर करण्यात आले. भाजपातर्फे ७ उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले होते. त्यामुळे २ अतिरिक्त उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक टळणार नव्हती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपातर्फे प्रसाद लाड आणि भाजपाने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मनोज कोटक या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे १० जागांवरचे १० उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले.
बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांत काँग्रेसतर्फे श्री. नारायण राणे, राष्ट्रवादीतर्फे विद्यमान सभापती रामराजे निंबाळकर आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिवसेनेतर्फे दिवाकर रावते आणि सुभाष देसाई, भाजपातर्फे विनायक मेटे, सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, आर. एन. सिंग आणि सूरजसिंग ठाकूर हे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.
दुपारी अडीच वाजता ही बातमी सर्वत्र माहीत झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाकडे धाव घेऊन बिनविरोध विजयी झाल्याबद्दल नारायण राणे यांचे अभिनंदन केले. विधान मंडळातील काँग्रेस पक्ष कार्यालयात नारायण राणे यांचे आगमन झाल्यावर तिथेही काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. ‘आता विधानसभेत काँग्रेसची तोफ धडाडणार’ अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांचे अभिनंदन स्वीकारल्यानंतर श्री. नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी विधान परिषद सभापती दालनात श्री. रामराजे नाईक-निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी या अभिनंदनाचा स्वीकार करून रामराजे यांनी नारायण यांचेही मन:पूर्वक अभिनंदन केले. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांना काँग्रेस विधान मंडळ पक्षातर्फे पत्र देऊन विधान परिषदेतील पहिल्या बाकावर विरोधी पक्षनेत्याच्या शेजारची क्रमांक दोनची सभागृहातील जागा नारायण राणे यांना दिली जावी अशी लेखी मागणी केली.
दरम्यान विधान परिषदेचे सभापती म्हणून रामराजे निंबाळकर यांची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे. शुक्रवारी झालेल्या १० जणांच्या बिनविरोध निवडणुकीत रामराजे निंबाळकर हे निवडून आलेले आहेत. विधान परिषदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै रोजी सुरू होत असून या अधिवेशनात पहिल्या दिवशी ‘प्रोटेन स्पीकर’ सभापतीपदाची निवड करण्याकरिता पीठासीन अधिकारी म्हणून सभागृहात बसतील. सभापतीपदावर पुन्हा रामराजे निंबाळकर यांचीच निवड होईल, मात्र विद्यमान निवडून आलेल्या १० पैकी ९ आमदारांना ७ जुलैपूर्वी (सभापतीपदाची मुदत संपायच्या आत) सभापती दालनात शपथ दिली जाईल. रामराजे निंबाळकर यांना मात्र, विधान परिषद सुरू झाल्यानंतर १८ जुलैला शपथ घ्यावी लागेल. कारण सध्या उपसभापतीपदही रिक्त आहे.
अभिनंदन साहेब… कोंकणचा आवाज परत आला धन्यवाद्द……….