एअर एशिया आणि टाटा समूहाच्या विमान कंपनी सुरू करण्यासाठीच्या संयुक्त उद्यमातील थेट परकीय गुंतवणुकीबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत.
नवी दिल्ली- एअर एशिया आणि टाटा समूहाच्या विमान कंपनी सुरू करण्यासाठीच्या संयुक्त उद्यमातील थेट परकीय गुंतवणुकीबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी संबंधित खात्यांनी प्राधान्याने सोडवण्याची आवश्यकता नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी व्यक्त केली आहे. नियमावलीतील अडचणी दूर झाल्यास त्यांना विमानसेवा सुरू करता येईल आणि देशात गुंतवणूकही वाढेल, असे त्यांनी म्हटले आहे.
थेट परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने नुकताच एअर एशिया आणि टाटा समूहाला विमान कंपनी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, परकीय कंपनी भारतातील नव्या कंपनीमध्ये थेट गुंतवणूक करू शकते का, याबाबत हवाई वाहतूक मंत्रालय साशंक आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने हवाई क्षेत्रातील एफडीआयसंदर्भातील नियमावलीवर स्पष्टीकरण मागितले आहे. त्यावर अहलुवालिया यांनी हा प्रश्न तात्काळ सोडवावा, असे म्हटले आहे.
टाटा अणि एअर एशिया संयुक्त उद्यम स्थापन करणार असतील, तर एअर एशियाला ४९ टक्के गुंतवणूक करण्यास काहीच हरकत नाही, असे अहलुवालिया यांनी म्हटले आहे. परकीय गुंतवणूक नियमावलीला अधिक सुस्पष्ट करणे आवश्यक असल्याचे नागरी हवाई वाहतूकमंत्री अजित सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते.
बरोबर आहे हजारो कोटींचा प्रश्न आहे. काही कोटींचा नैवेद्य दाखवल्याशिवाय परवानगी कशी मिळणार? तेव्हा अडचणी या निर्माण केल्या जाणारच. म्हणूनच भारतातली बव्हंशी विदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करायला घाबरतात