एखादी गोष्ट आपण विकत घ्यायला गेलो की दुकानदार शंभर पर्याय आपल्यासमोर ठेवतो. इतक्या वस्तू समोर असूनही आपल्याला मात्र त्यातली एकही वस्तू आवडत नाही. अशा वेळी आपल्या मनाप्रमाणे त्या वस्तूत बदल करून मिळाले तर किती बरं होईल असं वाटू लागतं. अशा ग्राहकांसाठी ‘कस्टमाईज’ वस्तूंची बाजारपेठ हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
खरेदीची आवड नाही असं क्वचितच कोणी सापडेल. स्वत:साठी किंवा दुस-यांसाठी आपण काही ना काही वस्तू खरेदी करतो. आपल्या मनासारखी किंवा समोरच्या व्यक्तीला आवडेल अशी वस्तू विकत घेण्यासाठी आपण संपूर्ण बाजार पालथा घालतो. पण बरेचदा होतं असं की आपल्याला ती मनपसंत वस्तू मिळत नाही. दुकानात एखाद्या वस्तूचे शेकडो पर्याय उपलब्ध असतात.
हे शेकडो पर्याय पाहून देखील आपल्या मनाचं समाधान होत नाही. या वस्तूचा रंग गडद, याचा रंग फिक्का आहे, याची डिझाईन मोठी आहे, याचा आकारच लहान आहे, असे एक ना दोन अनेक दोष काढून आपण मोकळे होतो. काही वेळा मनात नकळत तुलना सुरू होते. आपल्याला हवी तशी, हव्या त्या आकारात, हव्या असणा-या रंगात किंवा बदलात एखादी वस्तू कशी मिळेल? अशा वस्तूची कल्पना आपण फक्त मनात करू शकतो, बाजारात नाही असं आतापर्यंत अनेकांना वाटत होतं.
पण ही परिस्थिती आता राहिली नाही. हल्ली ग्राहकांच्या मागणीला जास्त महत्त्व देणारे विक्रेते बाजारपेठेत आहेत. जिथे विक्रेता तुमच्या आवडीला आणि गरजेला जास्त महत्त्व देतो आणि त्याप्रमाणे उत्पन्न तयार करतो. या संकल्पनेतून कस्टमाईज बाजारपेठेची निर्मिती झाली. ही कस्टमाईज बाजारपेठ किंवा कस्टमाईज हा प्रकार नक्की काय आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. इथे तुम्ही विक्रेत्याला तुमची आवड, तुमच्या मनातल्या कल्पना, तुमच्या गरजा सांगायच्या, तो ते लक्षपूर्वक ऐकतो आणि तुमच्या मनात एखाद्या वस्तूची जशी कल्पना असते ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं काम करतो. यालाच कस्टमाईज असं म्हणतात.
बघायला गेलं तर या कस्टमाईज वस्तूचा एक मोठा फायदा ग्राहकांना असतो तो म्हणजे या वस्तू तुमच्या डोक्यातील कल्पना आणि गरजांतून तयार झालेल्या असतात. त्यामुळे इथे तयार झालेल्या वस्तू या इतर वस्तूंच्या तुलनेत खूप वेगळ्या असतात. अशा वस्तू दुसरीकडे मिळणे अशक्य असतं. कारण प्रत्येक ग्राहकाची कल्पनाशक्ती वेगळी असते. या बाजारपेठेतील वस्तू फक्त तुमच्या आणि तुमच्याकरता तयार केलेली असते, त्यामुळे दुस-याकडे अगदी तशीच वस्तू सापडण्याचा प्रकार फार कमी होतो.
पण हल्ली काही विक्रेते थोडाफार बदल करून तशाच वस्तू ग्राहकांना विकतो. याचं एक उदाहरण म्हणजे हल्ली कस्टमाईज मग, किचेन, कॅलेंडर गिफ्ट शॉप सर्रास मिळतात. त्यावर दुकानदाराची ठरलेली प्रिंट असते फक्त या प्रिंटमधले फोटो तेवढे बदलतात. त्यामुळे कॉफी मग, किचेन, कॅलेंडर यासारख्या वस्तू घेताना तुम्हाला काही ठिकाणी त्या सारख्याच मिळतील.
हेअर क्लिप, हेअर बँडपासून ते चपला, कपडे, पर्स, गाडय़ा, डायरी, सौंदर्यप्रसाधनं, मोबाईल कव्हर, दागिने यासारख्या वस्तूच नाही तर लॅपटॉप, कॉम्प्युटर देखील तुम्ही कस्टमाईज करून घेऊ शकता. वस्तू कस्टमाईज करून देणारी काही दुकानं देखील आहेत, जिथे डिझायनर तुमच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे वस्तू बनवून देतात. गिफ्ट शॉप देखील आहेत, जिथे ठरावीक वस्तू कस्टमाईज करून मिळतात. लॅपटॉप, गाडय़ा, कॉम्प्युटरसारख्या गोष्टी त्या त्या कंपनीकडून देखील कस्टमाईज करून मिळतात. हल्ली कस्टमाईज वस्तूच्या वेबसाईट्स देखील आहेत.
जिथे तुम्ही एखाद्या वस्तूत तुमच्या आवडत्या रंगसंगतीत, डिझाईन, प्रिंट यामध्ये कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर बदल करून पाहू शकता. हे बदल तुमच्या मनाप्रमाणे झाले की तुम्ही त्या वस्तूची ऑर्डर देऊन त्या विकत देखील घेऊ शकता.
जर तुम्हाला क्रिएटिव्ह हटके वस्तू आवडत असतील तर कस्टमाईजचा पर्याय तुम्हाला नक्कीच आवडेल. आपल्या मित्र-मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी तुम्ही या पर्यायाचा विचार करू शकता. यामुळे समोरच्यालाही त्या वस्तूचं अप्रूप वाटतं आणि आपल्यालाही असं खास गिफ्ट दिल्याचा आनंद मिळतो.
आपलं वेगळेपण जपणा-या या वस्तू असल्या तरी या वस्तू तयार करून घेण्यासाठी ग्राहकांना मात्र याची किंमत अधिक मोजावी लागेल. वस्तू जितकी क्रिएटिव्ह असेल तितकीच तिची किंमत आणखी वाढत जाते.
माझ्या प्लॉट ची दिशा ही ईशान्य ते नेरयत्य अशी आहे व् साइज़ 15 रुंदी आणि 50 फुट लांबी आहे…!
वास्तु शास्र नुशार प्लान सुचवा …!!!
pshelar136@gmail.com
हा माझा ई-मेल असून यावर तुम्ही मला प्प्लां पाठवा प्ल्झ..!!