‘गोस्टोरीज’ या मोबाईल अॅपवर मराठीतील कथा आपण गाणी ऐकतो तशा नामवंत कलावंतांच्या आवाजात पार्श्वसंगीतासह ऐकायला मिळणार आहेत.
मुंबई- मराठी कथा वाचायच्या आहेत, पण वेळ मिळत नाही. प्रवासात पुस्तक सोबत ठेवणे शक्य होत नाही. आवड आहे, पण साहित्याचा आस्वादच घेता येत नाही.. अशा एक दोन नव्हे असंख्य तक्रारी चुटकीसरशी दूर करणारी बातमी आज ‘गोस्टोरीज’ या मोबाईल अॅपने दिली. या मोबाईल अॅपवर मराठीतील कथा आपण गाणी ऐकतो तशा नामवंत कलावंतांच्या आवाजात पार्श्वसंगीतासह ऐकायला मिळणार आहेत.
मराठी साहित्य रसिकांसाठी gostories हे नि:शुल्क अॅप सुरू झाल्याची घोषणा एका खास कार्यक्रमात या उपक्रमाच्या संपादक संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी केली. यावेळी ज्यांच्या कथा या अॅप्समध्ये आहेत ते प्रसिद्ध कथाकार-नाटककार रत्नाकर मतकरी, मंगला गोडबोले यांच्यासह ज्यांनी या कथांचे अभिवाचन केले ते अभिनेते अतुल कुलकर्णी, स्पृहा जोशी, ललित प्रभाकर, रोहन गुजर, तेजश्री प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते. ‘गोस्टोरीज’ची मूळ संकल्पना संदीप केळकर यांची असून, त्यांना नितीन बुधकर यांनी सहकार्य केले आहे. पार्श्वसंगीत आदित्य ओक यांचे आहे. मराठी साहित्य रसिकांना ही आनंदाची बातमी देण्यासाठी ‘गोस्टोरीज’ची टीम उपस्थित होती.
मनोरंजनाचे साधने वाढली आणि वाचनाचे प्रमाण कमी झाले. इंग्रजी माध्यमातून शिक्षणाच्या हल्लीच्या काळात मराठी पुस्तकांना नवा वाचक मिळणे दुर्मिळ झाल्याचे शल्य वेळोवेळी व्यक्त होत असते. या परिस्थितीत नुसतेच दु:खाचे कढ काढत न बसता आजच्या तरुण पिढीपर्यंत मराठीतीले अभिजात साहित्य न्यायला हवे, या तळमळीतून हे मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून ऑडिओ बुक आकाराला आले आहे. हे ‘गोस्टोरीज’ मोबाईल अॅप आता अँड्रॉइड व आयफोन, आयपॅडवर उपलब्ध आहे.
या अॅप्समध्ये पहिल्या टप्प्यात विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, मंगला गोडबोले, शं. ना. नवरे, द. मा. मिरासदार, विद्याधर पुंडलीक, प्रिया तेंडुलकर, संपदा जोगळेकर-कुलकर्णी आदी नामवंत लेखकांच्या कथा असून, त्यांच्या कथांचे अभिवाचन अतुल कुलकर्णी, जितेंद्र जोशी, स्पृहा जोशी, ऐश्वर्या नारकर, ललित प्रभाकर, रोहन गुजर यांनी केले आहे. या यादीत प्रख्यात साहित्यिकांच्या कथांसह प्रतिभावंत कलावंतांच्या नावांची टप्प्याटप्प्याने भर पडणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे हे अॅप आपण डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला २००० पॉईंट मिळतील. ते अॅप आपल्याकडून इतरांना शेअर केल्यास आपले पॉइंट्स वाढत जाणार आहेत. हे पॉइंट जसजसे वाढत जातील तसतसे या अॅपमधून जास्तीत जास्त कथा श्रवण करण्याची संधी मिळणार आहे.
स्तुत्य उपक्रम
खूप छान!!!