‘पहिली भेट’मध्ये असणा-या सात लोकेशन्सचं आव्हान या नाटकाचे दिग्दर्शक यतीन ठाकूर यांनी समर्थपणे पेललं आहे. सात लोकेशन्सच्या नेपथ्यासाठी या नाटकाचं एकूण साहित्य क्रिकेटपटूंच्या किटमध्ये सामावेल एवढंच आहे. हे नेपथ्याचं किट वाहून नेण्यासाठीही सोयीचं असून, खर्चही कमी झाला आहे. नाटकातील पाच कलावंत, तीन-चार बॅकस्टेज आर्टिस्ट आणि नेपथ्याचं किट एवढाच या नाटकाचा संसार असल्याने ते नाटक कुठेही सादर करण्यासाठी सर्वार्थानं परवडण्यासारखं असल्याचं दिग्दर्शक आवर्जून सांगतात.
आयुष्याच्या प्रत्येक थांब्यांवर कुणीतरी भेटतं. त्या भेटणा-यांपैकी काही माणसांसोबत झालेली पहिली भेट कायम आपल्या आठवणीत आपण कोरून ठेवतो. अशाच काही भेटींच्या प्रसंगांवर आधारित नाट्यकलाकृती मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मधुबिंब’ आणि ‘अरविन्दो मिरा’ या संस्थांचं हे नाटक रसिकांना नक्की आवडेल, असा विश्वास या नाटकाचे लेखक वैभव परब आणि दिग्दर्शक यतीन ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. नाटकाचं नाव आहे ‘पहिली भेट’.
लेखक आणि दिग्दर्शकाने या नाटकाचा प्रवास सांगितला. वैभव परब आणि यतीन ठाकूर हे दोघं पहिल्यांदा भेटले, त्या भेटीतच त्यांचं जमलं. नाटकाची गोष्ट दिग्दर्शकाला आवडली, त्यावर काम सुरू झालं आणि नाटक जन्माला आलं. लेखकाची वनलाईन दिग्दर्शकाला आवडली. त्या वनलाईनच्या आधारावर लेखकाने संहिता लिहिली. ती दिग्दर्शकासोबत वाचली. त्यात काही जुजबी बदल झाले. अदिती जहागिरदार यांच्याकडून या नाटकासाठी खास गाणं लिहून घेतलं. नेपथ्य, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजनाकारांनी त्यांचे आलेख तयार केले. कास्टिंग झालं आणि तालीम रंगली. आता येत्या २२ फेब्रुवारीला माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात शुभारंभाच्या प्रयोगासाठी ‘पहिली भेट’ सज्ज झालं आहे.
नाटकात एकूण आठ प्रसंग आणि तब्बल सात लोकेशन्स. नाटक ज्या ठिकाणी घडतं, ती स्थळं एकापेक्षा जास्त असली की, व्यवसायिक नाट्यनिर्मात्यांना ते धडकी भरवणारं असतं. ती लोकेशन्स बदलवणं म्हणजे काही सेकंदात आणि तेही अंधारात रंगमंचावर नेपथ्यरचना बदलवणं. हे सारं करायचं म्हणजे मॅनपॉवर लागते. वेळही जातो. ते सारं अचूक आणि नीटनेटकं करण्यासाठी कौशल्यही लागतं. हे सारे ताप अंगावर घेण्यापेक्षा बहुतांश व्यावसायिक नाटकं एकाच लोकेशनवर घडलेली दिसतात. ‘पहिली भेट’मध्ये असणारं सात लोकेशन्सचं आव्हान या नाटकाचे दिग्दर्शक यतीन ठाकूर यांनी समर्थपणे पेललं आहे. वेगवेगळी लोकेशन्स नाटकात दिसतील, मात्र ती बदलवण्यासाठी वेगळा प्रयोग नेपथ्यात करण्यात आला आहे. सात लोकेशन्सच्या नेपथ्यासाठी या नाटकाचं एकूण साहित्य क्रिकेटपटूंच्या किटमध्ये सामावेल एवढंच आहे. अॅल्युमिनियमच्या पाइपचा वापर करून, त्याला पाहिजे तसं फिरवून घेण्याची शक्कल लढवण्यात आली आहे. नेपथ्याचं किट वाहून नेण्यासाठीही सोयीची असून, बॅकस्टेज आर्टिस्टचा खर्चही या नाटकाच्या निर्मितीत कमी झाला आहे. नाटकातील पाच कलावंत, तीन-चार बॅकस्टेज आर्टिस्ट आणि नेपथ्याची किट एवढाच या नाटकाचा संसार असल्याने ते नाटक कुठंही सादर करण्यासाठी सर्वार्थानं परवडण्यासारखं असल्याचं दिग्दर्शक आवर्जून सांगतात. त्यामुळेच या नाटकाचे राज्यातील वेगवेगळ्या भागांत येत्या वर्षभरात शंभराहून अधिक कॉन्ट्रॅक्ट शो लागलेत, हेच या नाटकाचं मुहुर्तापूर्वीचंच यश आहे, असं लेखक-दिग्दर्शकाचं मत आहे.
‘पहिली भेट’मध्ये यतीन ठाकूर यांच्यासह रमेश चांदणे, मोनिका शेंडे, नयन पवार, वैशाली परुळेकर वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहेत. नेपथ्य संकल्पना यतीन ठाकूर यांची असून, पार्श्वसंगीत अनुराग गोडबोले यांचं आहे. ‘पहिली भेट’ रसिकांना आवडेल, असा लेखक-दिग्दर्शकाला असलेला विश्वास आहे.
Very Nice, All The Best