महाराष्ट्राचे माजी नगरविकासमंत्री रफिक झकेरिया यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. त्यांची आठवण आज होण्याचे कारण म्हणजे शहरात किती स्वस्तात घर उपलब्ध करून देता येते, याची त्यांनी कमाल केली होती.
महाराष्ट्राचे माजी नगरविकासमंत्री रफिक झकेरिया यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. त्यांची आठवण आज होण्याचे कारण म्हणजे शहरात किती स्वस्तात घर उपलब्ध करून देता येते, याची त्यांनी कमाल केली होती. १९७३साली त्यांनी औरंगाबादचा विकास करण्याचा निर्णय घेतला आणि विकासाची जबाबदारी सिडकोवर सोपवली. त्यांनी औरंगाबादच्या सिडकोत सुरुवातीला दोन हजार रुपयांना घर द्यायला सुरुवात केली होती. १० गुणिले १० आकाराची एक खोली, तिच्यातच एका कोप-यात स्वयंपाकाचा ओटा आणि या खोलीला जोडून एक संडास आणि एक स्नानगृह. या दोन्हींनाही वर छत नाही. घराला जोडून आणखी एका खोलीची मोकळी जागा. हे घर दोन हजार रुपयांच्या योजनेतून मिळणार होते. मात्र, नंतर किंमत वाढली आणि ती चार ते पाच हजार झाली. १९७४-७५च्या सुमाराला मध्यमवर्गीयांनाही आपले स्वत:चे घर हे स्वप्न वाटत होते. अशा लोकांनी आणि मोलमजुरी करून खाणा-या अनेक लोकांनी ही घरे घेतली. स्वस्त घरांची एक चांगली योजना औरंगाबाद सिडकोने राबवली. १९७३सालचे सव्वा लाख वस्तीचे औरंगाबाद आता १६ लाख लोकवस्तीचे झाले आहे. पण या वाढीव औरंगाबादेत घरांच्या किमती डोळे पांढरे व्हावेत, अशा वाढल्या नाहीत. आज पुण्या-मुंबईत घर घेताना तर देव आठवतातच. पण ज्यांना घर घ्यायचे नाही त्यांनाही घरांच्या किमती ऐकल्या तरी घेरी येते. सरकारने म्हाडा आणि सिडको यांच्यावर मुंबईत सामान्य लोकांना स्वस्त आणि परवडणा-या दरात घरे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी टाकली आहे. पण या संस्थांना सामान्यांना घरे देणे शक्य झाले नाही, ही बाब खेदजनक आहे. बुधवारी सिडकोने नव्या स्वस्त घरांची योजना जाहीर केली आहे. या योजनेत खारघर, उळवे परिसरात सात हजारांवर घरे बांधली जाणार आहेत. या घरांची किंमत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नेमकी सांगितली नाही. पण, ४५०० ते ५ हजार रुपये प्रति चौरस फूट दराने बांधकाम करून दिले जाईल, असे म्हटले आहे. या घरांसाठी लागणारी जागा सरकारी असेल आणि तिची किंमत घरात धरली जाणार नसल्याने आपली घरे स्वस्त असतील, असा त्यांचा दावा आहे. हा बांधकामाचा दर पाहिल्यावर ४०० चौरस फुटाची छोटी सदनिका २० लाखापर्यंत पडते. ही किंमत मुंबईतील आजच्या दरांच्या मानाने कमी वाटत असली तरीही २० लाखांची सदनिका कोणता सामान्य माणूस खरेदी करणार आहे? असे असले तरी सिडकोची घरे म्हाडाच्या घरांच्या मानाने स्वस्त असल्याचा त्यांचा दावा आहे. कारण म्हाडाची आता जाहीर झालेली घरे ७० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीला विकली जात आहेत. हा तर किमतीचा कहर आहे. पण याचा अर्थ सिडकोची घरे माफक किमतीला आहेत, असे म्हणता येत नाही. सिडकोची घरे संख्येनेही अधिक आहेत. म्हाडाला या वर्षी दोन हजारांवरच घरे देता आली आहेत. दोन्ही संस्थांची स्वस्त घरे सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. मुंबईत माणूस पोटासाठी येतो. त्याच्या कष्टाने या शहराची उभारणी होत आहे. म्हणूनच या कष्टकरी वर्गाला त्याला परवडणा-या किमतीत राहायला जागा मिळायला हवी. मात्र, आता म्हाडाच्या महाग झालेल्या घरांपाठोपाठ सिडकोनेही घरांचे दर वाढवून सामान्यांनाच घराबाहेरच ठेवले आहे.
Dear Sir,
Please to be sidco home