पेट्रोल पंपावरील इंधन घोटाळ्याचा सूत्रधार प्रशांत नूलकर याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे- पेट्रोल पंपावरील इंधन घोटाळ्याचा सूत्रधार प्रशांत नूलकर याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटकमधील हुबळी येथून ठाणे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
इलेक्ट्रॉनिक चीपद्वारे पेट्रोल पंपावरील मापकात फेरफार करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले होते. ही पेट्रोलचोरी पकडण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेकडून राज्यभरात धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. या कारवाई दरम्यान ठाणे जिल्ह्यात अवघ्या दिड महिन्यात ९८ पेट्रोलपंप सिल करण्यात आले.
ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी विवेक शेट्येसह सहाजणांना अटक केली. विवेकने देशभरातील पेट्रोल पंपावर चिप पुरवल्याचे कबुल केले तसेच प्रशांत नूलकरदेखील यामध्ये सामील असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नूलकरचा शोध घेण्यास सुरूवात केली. अखेर पोलिसांनी त्याला हुबळी येथून अटक केली.
पेट्रोल वेन्डिंग मशिनमध्ये झालेल्या छेडछाडीमुळे ग्राहकाला ४ ते ५ टक्के पेट्रोल कमी मिळत होते. म्हणजेच एका लिटरमागे जवळपास २० मिलीलिटर इंधनाचा घोटाळा होत होता. मात्र, मशीनवर योग्य तोच आकडा दिसत असल्याने ग्राहकाला संशय यायचा नाही आणि तो फसवला जायचा. अशा पद्धतीने एका पंपावर दिवसभरात शंभरहून अधिक लिटर इंधनाची चोरी होत असे.
दरम्यान, प्रशांत नूलकर हा इंधन मापके बनविणा-या कंपनीचा माजी कर्मचारी आहे. पेट्रोल मापक घोटाळ्याचा तो सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. पेट्रोल पंपावरील मशीनच्या तांत्रिक रचनेची त्याला पूर्ण माहिती आहे. पेट्रोल पंपावरील मशिनच्या चीप मिळवण्यात आणि पंपचालकांना मॅनेज करण्यात त्याचाच पुढाकार होता.
पुणे नाशिक रोड वर आळेफाटा येथील सर्व पेट्रोल पंप चेक करा.तेथेही कमी पेट्रोल मिळते असं बोललं जातंय. कुणी तक्रार करत नाही कारण पेट्रोल पंप धनदांडग्यांचे आहेत.तिथेही फेरफार केला जाऊ शकतो.