अंजू बॉबी जॉर्जला २००५ मधील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील रौप्यपदकावरून सुवर्णपदकावर बढती देण्यात आल्याने भारताची माजी धावपटू अश्विनी नचप्पा आनंदित झाल्या आहेत.
मुंबई- भारताची लांब उडी प्रकारातील माजी अॅथलीट अंजू बॉबी जॉर्जला २००५ मधील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील रौप्यपदकावरून सुवर्णपदकावर बढती देण्यात आल्याने भारताची माजी धावपटू अश्विनी नचप्पा आनंदित झाल्या आहेत. ‘‘अंजूने २००५ मध्ये जेव्हा जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते तेव्हा आम्ही जल्लोष केला होता. आता तर तिला सुवर्णपदकाचा मान देण्यात आल्याने आम्ही त्याचा आनंद साजरा करत आहोत. अंजूदेखील आता आनंदात आहे,’’ असे ४६ वर्षीय नचप्पा यांनी म्हटले.
अंजूने २००५ मध्ये मोनॅको जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. मात्र त्यावेळी सुवर्णपदक जिंकणारी रशियाची तात्याना कोटोवा डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने तिचे सुवर्ण काढून घेण्यात आले आहे. तो मान साहजिकच अंजूला मिळाला. अंजूने त्याची मंगळवारी (१४ जानेवारी) घोषणा केली. या बरोबरच जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत ट्रॅक आणि फिल्ड प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली.
क्रिकेटपटू युवराज सिंग आणि नचप्पाच्या उपस्थितीत प्युमातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘प्युमा रनिंग रिले’ची घोषणा करण्यात आली. जगप्रसिद्ध जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट हा प्युमाचा ब्रॅँड अँबॅसॅडर आहे.
‘डोपिंगची वाढती समस्या’
डोपिंगची समस्या भारतात वाढत चालत असल्याचे ‘क्लीन स्पोर्ट्स इंडिया’च्या अध्यक्ष असलेल्या नचप्पा यांनी म्हटले. ‘‘कामगिरी उंचवावी म्हणून देशात सर्रासपणे औषधे घेतली जातात. त्यामधूनच डोपिंगचे प्रकार घडतात. यात लहान मुलांचा अधिक समावेश आहे. ज्युनियर स्तरांवरील स्पर्धाना जाते तेव्हा प्रसाधनगृहांमध्ये डोपिंगला साथ देणारी औषधांची पाकिटे दिसतात. डोपिंगला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. सुरूवातीला प्रशिक्षकांना डोपिंगचे दुष्परिणाम समजून द्यायला हवेत. कारण प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसार क्रीडापटू संबंधित औषधे घेतात. डोपिंग सिद्ध करणारी औषधे कोणती, ते क्रीडापटूंना समजत नाही,’’ याकडे नचप्पा यांनी लक्ष वेधले.