रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णांची ये-जा असलेल्या नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला अखेर एमबीबीएस श्रेणीतील डॉक्टर मिळाला आहे.
नेरळ – रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णांची ये-जा असलेल्या नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला अखेर एमबीबीएस श्रेणीतील डॉक्टर मिळाला आहे. जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. पाटोळे यांनी, या प्रकरणी लक्ष घातल्याने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. अरुणा भांबेरे हे डॉक्टर नियुक्त झाले आहेत. राज्य सरकारने पुढील अकरा महिन्यांसाठी त्यांची नियुक्ती नेरळ दवाखान्यात केली आहे.
ऑगस्ट २०१२मध्ये नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता चौरासिया यांची पनवेल तालुक्यात बदली करण्यात आली होती. त्यानंतर आलेले एमबीबीएस श्रेणीचे डॉक्टर रमेश कराड यांचा स्त्रीरोग क्षेत्रातील अनुभव म्हणून सरकारने चार महिन्यांत त्यांची बदली पुणे येथे केली. या जागेवर नवीन डॉक्टर पाठवायला रायगड जिल्हा परिषद आणि राज्य सरकारला सहा महिने लागले. पुन्हा येथील डॉ. नितीन पन्हाळ तीन महिन्यांत नेरळ दवाखाना सोडून गेले. मागील वर्षापासून नेरळ दवाखाना कर्जत तालुक्यातील खांडस प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्तीवर असलेल्या डॉ. रमेश गवळी यांच्या खांद्यावर आहे. मात्र एमबीबीएस श्रेणीतील डॉक्टरांचे पद रिक्त असल्याने अनेक शत्रक्रिया नेरळमध्ये होत नव्हत्या. हे रिक्त पद भरावे म्हणून नेरळमधील तनिष्का व्यासपीठाने सातत्याने पाठपुरावा केला होता.
गेले अनेक महिने डॉक्टरांचे पद रिक्त असल्याने नेरळमधील काही महिला कार्यकर्त्यांनी थेट रायगड जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. हुकुम्चंद्र पाटोळे यांची भेट घेऊन अलिबाग येथून डॉक्टर पाठवण्याची मागणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला महिला वैद्यकीय अधिकारी मिळाले आहेत. डॉ अरुणा भांबेरे यांनी शनिवारी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा पदभार स्वीकारला. डॉ. भांबेरे यांची नियुक्ती केवळ ११ महिन्यांसाठीच असणार आहे.