मध्यमगती गोलंदाज अजित आगरकरकडे मुंबई रणजी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
मुंबई- मध्यमगती गोलंदाज अजित आगरकरकडे मुंबई रणजी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. पहिल्या चार लढतींमध्ये तो नेतृत्वाची धुरा सांभाळेल, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) संयुक्त सचिव आणि निवडसमितीचे समन्वयक नितीन दलाल यांनी सांगितले.
संपूर्ण मोसमासाठी आगरकरकडे कर्णधारपद का सोपवण्यात आले नाही, याबाबत त्यांनी अधिक बोलणे टाळले. दोन नोव्हेंबरपासून रणजी मोसमाला सुरुवात होत असून ‘अ’ गटाच्या सलामीच्या लढतीत (दोन नोव्हेंबर) घरच्या मैदानावर मुंबई रेल्वेशी दोन हात करेल. दरम्यान, २५ वर्षाखालील मुंबई संघाच्या कर्णधारपदी सर्वेश दामलेची निवड झाली आहे. संपूर्ण मोसमासाठी तो कर्णधार असेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सराव मिळावा म्हणून २५ वर्षाखालील संघात सलामीवीर अजिंक्य रहाणेचा समावेश करण्यात आल्याचे दलाल यांनी सांगितले.
२५ वर्षाखालील मुंबई संघ : सर्वेश दामले (कर्णधार), अजिंक्य रहाणे, कौस्तुभ पवार, स्वप्नील साळवी, ब्रविष शेट्टी, सिद्धेश लाड, निखिल पाटील (ज्युनियर), आदित्य तरे, निलकंठ परब, ओनिंदर सिंग, सागर गोरिवले, जावेद खान, प्रतीक दाभोळकर, मोहम्मद आमिर, शार्दुल ठाकूर.