विश्वचषकात ‘अ’ गटात बुधवारी होणा-या अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत यजमान ऑस्ट्रेलियाचे पारडे जड वाटते.
पर्थ- विश्वचषकात ‘अ’ गटात बुधवारी होणा-या अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत यजमान ऑस्ट्रेलियाचे पारडे जड वाटते. मात्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघाला कमकुवत लेखून चालत नाही.
ऑस्ट्रेलियाच्या नावावर तीन लढतींतून एकच विजय आहे. कारण बांगलादेशविरुद्धची लढत पावसामुळे वाया गेली होती. या स्थितीत गटवार साखळीतील उर्वरित तीनही लढतींत विजय मिळवले तरच न्यूझीलंडपाठोपाठ दुसरे स्थान ऑस्ट्रेलियाला मिळू शकते. न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला असला तरी गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. त्यातच अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाला मायदेशातच खेळायचे आहे. या स्थितीत यजमानांना मोठय़ा विजयाची संधी आहे. याउलट अफगाणिस्तान विश्वचषकातील पहिला विजय (स्कॉटलंड) नोंदवल्याने आनंदात आहे. आता ऑस्ट्रेलियाचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. मात्र ऑस्ट्रेलिया मोठा विजय मिळवू शकणार नाही यादृष्टीने प्रयत्न करण्याची अफगाणिस्तानला गरज आहे.
पर्थच्या वाका या उसळत्या चेंडूला साथ देणा-या खेळपट्टीचा फॉर्मात असलेला गोलंदाज मिचेल स्टार्कने फायदा घेतला नाही तर नवल. जोडीला मिचेल जॉन्सन फॉर्मात नसला तरी तो कधीही धोकादायक ठरू शकतो. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स साईड स्ट्रेनमुळे या लढतीला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोश हॅझेलवुडला संधी मिळू शकते. आता या वेगवान गोलंदाजांना अफगाणिस्तानचे फलंदाज कसे सामोरे जातात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्यातच फलंदाजी ही अफगाणिस्तानसाठी चिंतेची बाब आहे. स्कॉटलंडविरुद्ध विजय मिळवला असला तरी त्यांचे २११ धावांचे आव्हान गाठताना अफगाणिस्तानने ९ विकेट गमावल्या होत्या. हमिद हसन आणि शपूर झाद्रन या शेवटच्या जोडगोळीने अफगाणिस्तानला सावरले होते. आघाडीच्या फलंदाजांमध्ये समिउल्ला शेनवारी वगळता अन्य सर्व फलंदाज स्कॉटलंडविरुद्ध अपयशी ठरले होते. कर्णधार मोहम्मद नाबी, जावेद अहमदी, नवरोझ मंगल, असघर स्टॅनिकझाई या सर्व फलंदाजांना खेळपट्टीवर टिकून राहण्याची गरज आहे.
गोलंदाजी ही अफगाणिस्तानची जमेची बाजू आहे. श्रीलंकेविरुद्धची लढत गमावली असली तरी त्यांनी एका वेळी श्रीलंकेची अवस्था ४ बाद ५१ स्थिती केली होती. स्कॉटलंडलाही त्यांनी २१० धावांत गुंडाळले होते. शपूर झाडरन, दौलत झाडरन आणि हमिद हसन हे वेगवान त्रिकुट हे अफगाणिस्तानची ताकद आहे. आता हे त्रिकुट ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या बलाढय़ फळीला कसे रोखते ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्यातच न्यूझीलंडविरुद्ध झटपट गारद झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवर बोट ठेवले गेले. मात्र एकंदरीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची विश्वचषकातील कामगिरी बरी राहिली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच या सलामीवीरांवर सर्वाधिक भिस्त आहे. कर्णधार मायकेल क्लार्ककडूनही योगदानाची अपेक्षा आहे. जोडीला ग्लेन मॅक्सवेल, जॉर्ज बेली, स्टीवन स्मिथ यांच्याकडून मधल्या फळीत योग्य योगदानाची अपेक्षा आहे. त्यातच अष्टपैलू जेम्स फॉकनर तंदुरुस्त झाला तर सातत्याने अपयशी ठरणारा अष्टपैलू शेन वॉटसनला संघाबाहेर बसावे लागू शकते.
ऑस्ट्रेलिया- मायकेल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली, पॅट कमिन्स, झेव्हियर डॉहर्टी, जेम्स फॉकनर, आरोन फिंच, ब्रॅड हॅडिन (यष्टिरक्षक), जोश हॅझेलवुड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन.
अफगाणिस्तान- मोहम्मद नाबी (कर्णधार), अफसर झाझाई (यष्टिरक्षक), आफताब आलम, असघर स्टॅनिकझाई, दावलत झाडरन, गुल्बादिन नायब, हमिद हसन, जावेद अहमदी, मिरवाईस अश्रफ, नजिबुल्ला झाडरन, नासिर जामल, नवरोझ मंगल, समिउल्ला शेनवरी, शपूर झाडरन, उस्मान घनी.