अव्वल मानांकित अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि १०वी मानांकित डेन्मार्कची कॅरोलिना वोझनियाकी यांच्यात रविवारी अमेरिकन ओपन ग्रॅँडस्लॅमची महिला एकेरीची अंतिम लढत आहे.
न्यूयॉर्क- अव्वल मानांकित अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि १०वी मानांकित डेन्मार्कची कॅरोलिना वोझनियाकी यांच्यात रविवारी अमेरिकन ओपन ग्रॅँडस्लॅमची महिला एकेरीची अंतिम लढत आहे. सेरेना सलग तिस-यांदा अमेरिकन ओपन जिंकण्यासाठी सज्ज आहे. जर सेरेना जिंकली तर तिचे ते कारकीर्दीतील १८वे ग्रॅँडस्लॅम ठरेल. त्याबरोबरच ती मार्टिना नवरतिलोवा आणि ख्रिस एव्हर्ट यांच्या १८ ग्रॅँडस्लॅमची बरोबरी साधेल. त्यातच तिचे ते या स्पर्धेतील सहावे ग्रॅँडस्लॅम ठरू शकते. त्यातच सेरेनाला या वर्षात एकही ग्रॅँडस्लॅम जिंकता आलेले नाही. याउलट कारकीर्दीतील पहिल्या ग्रॅँडस्लॅमसाठी उत्सुक वोझनियाकीला २००९मध्ये याच स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
सेरेनाने फॉर्म कायम राखत उपांत्य फेरीही सहज जिंकली. तिने १७वी मानांकित रशियाच्या इकॅटरिना मॅकॅरोवाला ६-१, ६-३ सहज नमवले. याउलट चीनच्या शुई पेंगने उन्हाचा त्रास झाल्याने माघार घेतली त्यामुळे वोझनियाकीला आगेकूच करता आली. मात्र तोपर्यंत वोझनियाकीही ७-६, ४-३ पुढे होती.
सेरेनाने वोझनियाकीविरुद्ध नेहमीच वर्चस्व गाजवले आहे. या ग्रॅँडस्लॅमपूर्वीच्या मॉँट्रियल आणि सिनसिनाटी डब्लूटीए टेनिस स्पर्धेत सेरेनाने वोझनियाकीला नमवले होते. ते पाहता ती जेतेपदाची दावेदार मानण्यात येत आहे. मात्र वोझनियाकीने या ग्रॅँडस्लॅममध्ये चौथ्या फेरीत पाचवी मानांकित रशियाच्या मारिया शारापोवाला पराभवाचा धक्का दिला होता. ते पाहता ती सेरेनाला चुरस देण्यासाठी सज्ज आहे. मात्र सेरेनाने अंतिम फेरी गाठताना अद्याप एकही सेट गमावलेला नाही. पहिल्या फेरीपासूनच्या सर्व लढती तिने एकहाती जिंकल्या आहेत. याउलट वोझनियाकीला पहिल्याच राउंडमध्ये स्लोवाकियाच्या रिबॅरिकोवाविरुद्ध तीन सेटवर झुंज द्यावी लागली होती. शारापोवाविरुद्धही तिला तीन सेटवरच विजय मिळवता आला होता. अन्य लढतींमध्ये मात्र तिने दोन सेटवर विजय नोंदवले आहेत.
दोघी आमनेसामने – ९ वेळा : सेरेनाचे ८ विजय, वोझनियाकीचा एक विजय
वेळ : मध्यरात्री २वा. थेट प्रक्षेपण : टेन स्पोर्ट्स