दक्षिण कोरियाचे विमान अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को विमानतळाच्या धावपट्टीवर कोसळले. या अपघातात दोन ठार तर १८१ जण जखमी झाले आहेत.
वॉशिंग्टन- दक्षिण कोरियाच्या एशियाना एअरलाइन्सचे विमान अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को विमानतळाच्या धावपट्टीवर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोन ठार तर १८१ जण जखमी झाले आहेत. या विमानातील आपत्कालिन खिडक्यांचा वापर केल्याने ३०७ जणांचे प्राण वाचले.
एशियाना एअरलाइन्सचे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेअकरा वाजता सॅनफ्रान्सिस्को विमानतळावर उतरत होते. त्याचवेळी विमानाची शेपटी धावपट्टीवर आदळली. त्यामुळे हा अपघात घडला. या विमानात २९१ प्रवाशांसह १६ विमान कर्मचारी होते.
या विमान अपघाताचे नेमके कारण शोधण्यात येत आहे. या दुर्घटनेबाबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, होमलँड सिक्युरिटी आणि दहशतवादविरोधी पथकाला तातडीने माहिती देण्यात आली.
या दुर्घटनेत तीन भारतीय जखमी झाले आहेत. त्यापैकी वेदपाल सिंग यांच्या खांद्याच्या हाडाला फ्रॅक्चर झाले आहे. विमानाची शेपटी प्रथम जमिनीला आदळली. त्यानंतर विमानाचा वरील भाग पूर्णपणे नष्ट झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.