अर्थ मंत्रालयाच्या सचिव पदावरून पर्यटन मंत्रालयात बदली केलेल्या अरविंद मायाराम यांची १५ दिवसांच्या आत गुरुवारी पुन्हा केंद्र सरकारने पर्यटन मंत्रालयातून अल्पसंख्याक मंत्रालयात बदली केली आहे.
नवी दिल्ली- अर्थ मंत्रालयाच्या सचिव पदावरून पर्यटन मंत्रालयात बदली केलेल्या अरविंद मायाराम यांची १५ दिवसांच्या आत गुरुवारी पुन्हा केंद्र सरकारने पर्यटन मंत्रालयातून अल्पसंख्याक मंत्रालयात बदली केली आहे.
मायाराम हे राजस्थान कॅडरचे १९७८च्या बॅच मधील आयएएस अधिकारी आहेत. नुकतीच मायाराम यांची अर्थ मंत्रालयाच्या सचिव पदावरून पर्यटन मंत्रालयाचे सचिव म्हणून बदली केली होती. त्यांच्याजागी राजस्थानचे मुख्य सचिव राजीव मेहर्षी यांना १५ ऑक्टोबरला अर्थ सचिव म्हणून नियुक्त केले आहे.
त्यांनी अद्याप आपला पदभारही स्विकारला नव्हता. मात्र केंद्र सरकाच्या नियुक्ती समितीने मायाराम यांची पर्यटन मंत्रालयातून अल्पसंख्याक मंत्रालयाच्या सचिव पदी बदली केली. तर अल्पसंख्याक मंत्रालयाचे सचिव ललित पानवार यांची नेमणूक पर्यटन मंत्रालयाच्या सचिवपदी केली आहे.
तसेच नियुक्ती समितीने राजीव मेहर्षी हे पदभार स्विकारेपर्यंत एक महिन्यासाठी रतन वातल यांच्याकडे अर्थ सचिवांचा अतिरिक्त पदभार सोपवला आहे.