पाच वेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंदला कॅँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत मंगळवारी दहाव्या फेरीअखेर एका गुणाने आघाडी कायम राखण्यात यश आले.
खॅँती मॅन्सिस्क (रशिया) – पाच वेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंदला कॅँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत मंगळवारी दहाव्या फेरीअखेर एका गुणाने आघाडी कायम राखण्यात यश आले. ते पाहता जगज्जेता मॅग्नस कार्लसनचा आव्हानवीर ठरवण्याच्या या महत्त्वपूर्ण स्पर्धेत चार फे-या शिल्लक असताना आनंदला बाजी मारण्याची मोठी संधी आहे.
या फेरीत आनंदचा डाव बरोबरीत संपला असला तरी प्रबळ दावेदार आर्मेनियाच्या लेवॉन अरोनियानलाही बल्गेरियाच्या व्हॅसेलिन टोपालोवविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. अरोनियानचा डाव बरोबरीत सुटल्याने आनंदला (साडेसहा) एका गुणाची आघाडी टिकवता आली. स्पर्धेत सर्वाधिक ‘फिडे रेटिंग’ असलेला अरोनियानला साडेपाच गुणांसह पुन्हा दुस-या स्थानी समाधान मानावे लागले. टोपालोवविरुद्ध मिळालेल्या विजयाच्या संधीचा अरोनियानला फायदा घेता आला नाही.
पांढ-या मोह-यांनिशी खेळताना आनंदने अझरबैजानच्या शॉखरियार मामेद्यारोवविरुद्ध ३०व्या चालीतच बरोबरी मान्य केली. जास्त आक्रमक न खेळता बरोबरीत समाधान मानल्याचे आनंदने डावानंतर मान्य केले. नायडॉर्फ सिसिलियन पद्धतीचा आनंदने पुन्हा या डावात अवलंब केला. रविवारी टोपालोवविरुद्धही आनंदने हे तंत्र वापरले होते. मात्र मामेद्यारोवने आनंदकडून याआधी स्पर्धेत स्वीकारलेल्या पराभवातून धडा घेतलेला दिसला. त्याने काळ्या मोह-यांनिशी खेळताना आनंदच्या चालींना तोडीसतोड उत्तर दिले. आक्रमकता न अवलंबवता त्याने चुकाही टाळल्या. त्याचा फायदा मामेद्यारोवला डाव बरोबरीत सोडवण्यात झाला.
आनंदचा डाव दोन तासांमध्येच आटोपल्यावर साहजिकच सर्वाचे लक्ष अरोनियानकडे होते. स्लाव डिफेन्सचा अवलंब झालेल्या या डावात अरोनियान सुरुवातीला वरचढ वाटत होता. मात्र ३०व्या चालीत (जी ५) खेळलेली चाल टोपालोवला बचाव करण्यासाठी उपयोगी पडल्याचे दिसले. दोघांनाही वेळ वाढवून देण्यात आल्याने डाव रंगला होता. मात्र अखेर ४५व्या चालीला अरोनियानने बरोबरी मान्य केली.
व्लादिमिर क्रॅमनिकने मोक्याच्या क्षणी केलेली घोडचूक त्याला त्याचा रशियाचा देशबंधू पीटर स्विडलरविरुद्ध पराभव मान्य करण्यास कारणीभूत ठरली. पांढ-या मोह-यांनिशी खेळताना क्रॅमनिकला ३९व्या चालीत पराभव मान्य करावा लागला. स्विडलरला या विजयामुळे मामेद्यारोव आणि कार्याकिनसोबत पाच गुणांसह संयुक्त तिसरे स्थान मिळाले. क्रॅमनिक आणि आंद्रेइकीन यांचे संयुक्त साडेचार गुण असून टोपालोवचे चार गुण आहेत. अन्य लढतीत सर्गेइ कार्याकिन आणि दिमित्री आंद्रेइकीन यांच्यात फार न रंगलेला डाव २९ चालींतच बरोबरीत संपला.
११वी फेरी आज
व्लादिमिर क्रॅमनिक वि. विश्वनाथन आनंद
पीटर स्विडलर वि. लेवॉन अरोनियान
व्हॅसेलिन टोपालोव वि. सर्गेई कार्याकिन
दिमित्री आंद्रेइकीन वि. शॉखरियार मामेद्यारोव