शहरात वाहतूक कोंडी नवी नाही. या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेतर्फे सोमवारपासून नौपाडा परिसरात प्रायोगिक तत्त्वावर पुणे पॅटर्न राबवला जाणार आहे.
ठाणे – शहरात वाहतूक कोंडी नवी नाही. या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेतर्फे सोमवारपासून नौपाडा परिसरात प्रायोगिक तत्त्वावर पुणे पॅटर्न राबवला जाणार आहे. हा पॅटर्न ठाणेकरांना किती रुचतो. हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
शहरात वाहनतळाचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहनांच्या संख्येनुसार रस्त्यांची वाढ न झाल्याने वाहने उभी करण्याची समस्या गहन होत आहे. यासाठी सध्या राबवली जात असलेली सम आणि विषम तारखांची वाहने उभी करण्याची पद्धत रद्द करून प्रायोगिक तत्त्वावर पुणे पॅटर्न राबवण्याचा वाहतूक शाखेचा प्रयत्न आहे.
त्यामुळे सकाळी वाहने लावून रात्रीपर्यंत न फिरकणा-या वाहनचालकांची कोंडी होणार आहे. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सोमवारपासून नौपाडय़ामध्ये १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हा पॅटर्न राबवला जाणार आहे. त्यानंतरच त्याचा लाभ समजेल.
कसा आहे पॅटर्न
पुण्यामध्ये लक्ष्मी रस्त्यावर मर्यादित काळासाठी वाहने उभी करण्याची पद्धत आहे. त्याचा प्रयोग नौपाडय़ात केला जाणार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाहने उभी करून ठेवल्यामुळे दिवसभर रस्ते अडवले जातात. अशा तक्रारी व्यापा-यांनी वहतूक शाखेकडे केल्याने वाहतूक पोलिसांनी नवा प्रयोग राबवण्याचे ठरवले आहे.
त्यानुसार ६ते दुपारी ३ आणि सायंकाळी ६ ते रात्री १२अशी ९ तासांसाठी वाहने उभी करण्याची पद्धत राबवली जाणार आहे. ठाणे शहरात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अनेक मार्ग एकमार्गी करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडत आहेत. असे असताना आता हा नवा पॅटर्न किती लागू होतो, हे येत्या काही दिवसांत कळणार आहे.